बेळगाव—belgavkar—belgaum : मी नगरसेवक असलो तरी अधिकारी व कर्मचार्यांकडून योग्य वागणूक मिळत नाही. सभागृहात संमत झालेल्या ठरावांवर अंमलबजावणी होत नाही. एजंटांकडून लोकांची लूबाडणूक होत आहे. त्यांना अधिकारी वर्गाची साथ आहे, असा आरोप करत नगरसेवक शंकर पाटील यांनी सोमवारी महापालिका कार्यालयाच्या पायर्यांवर धरणे आंदोलन केले.
महापालिकेत अधिकारी आणि कर्मचारी वर्गाकडून नगरसेवकांना योग्य वागणूक मिळत नाही. आम्ही अधिकार्यांकडे कामे घेऊन गेलो तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याउलट एजंटाकडून लोकांची कामे होत आहे. त्यासाठी एजंंट आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात पैसे काढत आहेत. त्याचा सामान्य लोकांना फटका बसत आहे. 2023 मध्ये रिसालदार गल्लीतील जुन्या महापालिकेच्या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृती दालन आणि ग्रंथालय उभारण्याचा ठराव झाला आहे. बकरी मंडईत विकासकामे राबवण्याचा ठराव झाला आहे. पण, या ठरावांवर कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत अधिकार्यांना विचारले असता पैसा नाही, असे सांगण्यात येते.
वर्क ऑर्डर निघालेली कामेसुद्धा होत नाहीत. त्यामुळे, आम्ही नगरसेवक असूनही काही किंमत राहिली नाही. अनेक अधिकारी आणि कर्मचारी नगरसेवकांना ओळखतही नाहीत. त्यामुळे प्रभागात आमची नाचक्की होत आहे, असा आरोप करत नगरसेवक पाटील यांनी महापालिकेच्या पायर्यांवर धरणे आंदोलन केले.
नगरसेवक पाटील यांनी दुपारपर्यंत आंदोलन केले. त्यानंतर आयुक्त शुभा बी. यांच्या अनुपस्थितीत प्रभारी आयुक्त तथा कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी, महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी आणि इतर अधिकार्यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. सर्व मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर नगरसेवक पाटील यांनी आंदोलन मागे घेतले.
