बेळगाव—belgavkar—belgaum : मोटारसायकली चोरी प्रकरणी 2 मुलांना अटक करण्यात आली आहे. शहापूर पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून चोरीच्या 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या अल्पवयीन मुलांनी बेळगाव परिसरातील विविध ठिकाणी मोटारसायकली चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्दाप्पा सिमानी, उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, उपनिरीक्षक एन. एस. बस्वा, शिवशंकर गुडदेगोळ, श्रीधर तळवार, जगदीश हादीमनी, शिवराज पच्चण्णवर, अजित शिपुरे, सिद्धरामेश्वर मुगळखोड आदींनी ही कारवाई केली आहे.
जुने बेळगाव येथील धारवाड नाका परिसरात मोटारसायकलवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकली चोरल्याचे उघडकीस आले. या दोघा जणांनी काकती, पिरनवाडी व येळ्ळूर येथे चोरी केल्याची कबुली दिली असून त्यांच्याजवळून 1 लाख 27 हजार रुपये किमतीच्या 3 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
