Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'यावेळी काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळतील. त्यांचा अजेंडा मुस्लिमांना प्रस्थापित करण्याचा आहे. त्यांना देशात इस्लामिक स्टेट बनवायचा आहे. जोपर्यंत भारतात सनातनचे बहुमत आहे तोपर्यंत लोकशाही आहे' असं गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे विधान पुढे करत बेगुसराय लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार गिरीराज सिंह म्हणाले की, पंडित नेहरू यांनी भारतातील हिंदूंना धोका दिला. जेव्हा 400 पार जागा जातील तेव्हा भारताचा विकास, भारताचा वारसा, काशी-मथुरा विकसित होईल. दिल्लीत एका जाहीर सभेला संबोधित करताना सरमा म्हणाले होते की, लोकसभा निवडणुकीत भाजपा जेव्हा 400 चा आकडा पार करेल तेव्हा मथुरेतील कृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिर बांधले जाईल आणि काशीतील ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथ यांचं भव्य मंदिर बांधले जाईल.
राहुल-सोनिया देश सोडून पळून जाणार : राहुल गांधी आणि सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार आहेत. त्यांना देशाबद्दल प्रेम नाही. यावेळी त्यांना मागच्या वेळेपेक्षा कमी जागा मिळतील आणि ते भारतातून पळून जातील. काँग्रेसला 40 पेक्षा कमी जागा मिळतील' असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत त्यांचा चेहरा भ्रष्ट असल्याचं म्हटलं आहे.
जेव्हापासून राहुल गांधी आणि तुकडे तुकडे गँग आली तेव्हापासून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करण्यात आला आहे. गरीबाचा मुलगा पंतप्रधान कसा झाला हे त्यांना अजून पचनी पडत नाही. जेवढ्या वेळा ते मोदींना शिवीगाळ करत आहेत, तिकक्या वेळा मोदी त्यातून आणखी मजबूत होऊन बाहेर पडत आहेत. जनतेने त्यांना भरभरून प्रेम दिलं आहे. फारुख अब्दुल्ला यांना पंतप्रधान मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं, असंही गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे.