उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य करत ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेत म्हणाल्या की, “महाकुंभ आता मृत्युकुंभ’ बनला आहे.” महाकुंभमेळ्यात व्हीव्हीआयपींना विशेष सुविधा दिल्या जात आहेत, तर सामान्य लोकांना तिथे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीवरून त्यांनी योगी सरकारला घेरत तेथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे म्हटले आहे.काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?पश्चिम बंगालच्या विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “हा ‘मृत्युकुंभ’ आहे. मी महाकुंभचा आदर करते, मी पवित्र गंगा मातेचा आदर करते पण तिथे कोणतीही व्यवस्था नाही. श्रीमंत, व्हीआयपींसाठी 1 लाख रुपयांपर्यंतच्या तंबूंची तरतूद आहे. मात्र, गरिबांसाठी कुंभमेळ्यात कोणतीही व्यवस्था नाही. मेळ्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती होणे सामान्य आहे, पण हे होऊ नये यासाठी योग्य व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. हे रोखण्यासाठी तुम्ही काय योजना आखल्या?”
पश्चिम बंगाल विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना, ममता बॅनर्जी यांनी प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याच्या कथित गैरव्यवस्थापनाबद्दल भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. त्या म्हणाल्या, “महाकुंभ ‘मृत्युकुंभ’ बनला आहे.”
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर 18 भाविक मृत्यूमुखीदोन दिवसांपूर्वी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्या पकडताना चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला होता. यानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभ ‘फालतू’ असल्याचे म्हटले होते. याशिवाय, महाकुंभातील व्हीआयपी संस्कृतीवरून विरोधी पक्षांचे अनेक नेते योगी आदित्यनाथ सरकारवर सतत टीका करत आहेत.
चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यूयंदाचा महाकुंभमेळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत दोन वेळा चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला होता तर 60 जण जखमी झाले होते. यानंतर, 15 फेब्रुवारीच्या रात्री, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरही चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांत, महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे, अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडीही होत आहे.
