बेळगाव—belgavkar—belgaum : हातउसने घेतलेले पैसे परत करण्यास टाळाटाळ केल्याने रागाच्या भरात एकाचा कोयत्याने वार करून खून केलेल्या संशयिताची सहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मिथुन महादेव कुगजी (रा. येळ्ळूर) असे त्याचे नाव आहे. संजू तुकाराम पाटील (वय 34, रा. इंदिरा कॉलनी, येळ्ळूर) असे मयताचे नाव असून मिथुनवर त्याच्या खुनाचा आरोप होता. हे दोघेजण मित्र होते.
मिथुन हा सेंट्रिंग मेस्त्री होता. त्यामुळे त्याच्याकडे कामाला येतो, असे सांगून संजूने 20000 रुपये हातउसने घेतले होते. मात्र, तो त्याच्याकडे कामाला गेलाच नाही. तसेच घेतलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद होता. 14 जून 2023 रोजी सायंकाळी संजूला संशयिताने बेळगावला जाऊया, असे सांगून आपल्या दुचाकीवर बसवून घेतले. त्यानंतर शहापूर येथील एका बारमध्ये दोघांनीही दारू ढोसली. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोघे मित्रदेखील होते.
बिगबाजार समोरील एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्यानंतर अनगोळ येथील तलावाच्या बाजूला येऊन दोघांनी पुन्हा मद्यप्राशन केले. त्यावेळी दोघांमध्ये पैशाच्या व्यवहारातून भांडण सुरु झाले. पैसे देण्यास का टाळाटाळ करतोस? अशी विचारणा मिथुनने केल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रागाच्याभरात मिथुनने संजूच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने तो जागीच ठार झाला. त्यामुळे याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयिताला अटक केली. या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दाखल दोषारोप करण्यात आल्याने सहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात सुनावणी सुरु होती.
त्यावेळी फिर्यादीतर्फे एकूण 24 साक्षीदार, 68 कागदोपत्री पुरावे, 10 मुद्देमाल तपासण्यात आले. पण पोलीस तपासातील अनेक चुका व त्रुटी, तसेच साक्षीदारांच्या जबाबातील विरोधाभासामुळे न्यायालयाने बचाव पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन सरकारी पक्षाचा पुरावा पुरेसा व अविश्वसनीय असल्याने आरोपीची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. सुधीर एम. गावडे, अॅड. मलिकजान बाळप्रवेश, अॅड. करिश्मा नेसरकर यांनी काम पाहिले.
