मुलगा प्रदेशाध्यक्ष, निष्ठावंताला विरोधी पक्षनेतेपद;

मुलगा प्रदेशाध्यक्ष, निष्ठावंताला विरोधी पक्षनेतेपद;

belgavkar.com | belgaum | belgavkar

येडियुरप्पा यांचा पुन्हा एकदा कर्नाटक भाजपामध्ये वरचष्मा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी कर्नाटक भाजपाने अद्याप विधानसभा विरोधी पक्षनेते ठरविला नव्हता. गेल्या अनेक काळापासून रिक्त असलेले प्रदेशाध्यपदी नेता निवडल्यानंतर आता माजी उपमुख्यमंत्री आणि सात वेळा आमदार असलेले आर. अशोका यांना शुक्रवारी विरोधी पक्षनेता म्हणून घोषित करण्यात आले. कर्नाटक विधानसभेत भाजपाचे 66 आमदार आहेत. भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी 65 वर्षीय अशोका यांची विरोधी पक्षनेत्यापदी एकमताने निवड केली.
अशोका हे वोक्कलिगा समाजाचे नेते असून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांचे नाव सुचविले आणि माजी मंत्री व्ही. सुनील कुमार यांनी त्याला अनुमोदन दिले. दोन्ही नेत्यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे केली होती. मात्र अखेरीस सहा महिन्यांनी अशोका यांची निवड झाली.

अशोका हे बी. एस. येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगतिले जाते. त्यांना विरोधी पक्षनेते पद बहाल केल्यामुळे बी. एस. येडियुरप्पा यांचे कर्नाटकाच्या राजकारणात पुनरागमन झाल्याचे बोलले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाला प्रदेशाध्यक्ष पद दिले गेले होते. शुक्रवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत भाजपामध्ये दोन गटही दिसून आले. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बसवराज पाटील यतनाळ यांनी आंदोलन केले. ते विरोधी पक्षनेत्यासाठी इच्छूक होते, त्याआधी प्रदेशाध्यक्ष पद मिळण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते.
येडियुरप्पा यांच्याप्रमाणेच लिंगायत नेते असलेल्या यतनाळ यांनी म्हटले की, उत्तर कर्नाटकातील एखादा व्यक्ती पक्षाचा नेता का होऊ शकत नाही? फक्त दक्षिण कर्नाटकामधीलच नेत्यांना पक्षात महत्त्वाची पदे कशी काय मिळतात? सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय नेतृत्वाने येडियुरप्पा यांना महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय संघटक सचिव बी. एल. संतोष यांच्या निकटवर्तीयांची नवी फळी कर्नाटकात उभी करण्यात आली. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला, ज्यामुळे आता पक्षाला आपल्या रणनीतीमध्ये पुन्हा नवा विचार करण्याची गरज वाटली.
अशोका हे येडियुरप्पा यांचे निष्ठावान समजले जातात. 2021 साली जेव्हा भाजपाने येडियुरप्पा यांना बाजूला करून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदावर बसविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अशोका यांनी “आम्ही येडियुरप्पा यांच्या पाठिशी आहोत, मी येडियुरप्पा यांच्यासमवेत आहे”, अशी रोखठोक भूमिका मांडली. तसेच अशोका यांची निवड केल्यामुळे भाजपाचा नवा मित्र पक्ष जेडी(एस) शी आगामी लोकसभा निवडणुकीत जोडून घेण्यासही मदत होणार आहे. अशोका यांचे जेडीएस पक्षाचे नेते आणि वोक्कलिगा समाजाचे राज्यातील मोठे नेते देवेगौडा कुटुंबियांसोबत चांगले संबंध आहेत.
अशोका हे दक्षिण बंगळुरूमधील पद्मनाभनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, याठिकाणी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे वास्तव्य आहे. गौडा परिवाराशी त्यांचे चांगले संबंध असल्यामुळेच ते या मतदारसंघातून मागच्या सात निवडणुकांपासून विजय होत आले आहेत. एका लिंगायत नेत्याला प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त केल्यानंतर आणि वोक्कलिगा समाजाच्या देवेगौडांशी युती केल्यानंतर, भाजपातर्फे विरोधी पक्षनेत्यापदी ओबीसी समाजातील नेत्याची निवड केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र अशोका यांची ज्येष्ठता इतर नेत्यांपेक्षा अधिक असल्यामुळे आणि त्यांच्या 35 वर्षांच्या अनुभवामुळे त्यांना या पदावर निवडण्यात आले. तसेच येडियुरप्पा यांचा मुलगा आणि भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांचे वय केवळ 47 आहे. त्यामुळे दुसरा एखादा ज्येष्ठ नेता निवडला असता तर दोघांमध्ये समन्वय राखणे कठीण गेले असते.
अशोका यांची नियुक्ती केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही दोघेही एकत्रितपणे कोणताही वाद आणि मतभेदाशिवाय काम करू. आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमधील सर्वच्या सर्व 28 जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही एकजुटीने काम करू. तसेच विधासभेत भाजपाचे 66 आणि जेडीएसने 19 आमदार मिळून 85 आमदारांची ताकद होते. हा आकडा काही लहान नाही. आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र लढा देऊ.

भाजपाच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना अशोका म्हणाले, “नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत, एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यामुळेच नवा विरोधी पक्षनेता निवडताना कोणतीही शंका किंवा अडतळा निर्माण होऊ न देण्याचा प्रयत्न आम्ही केला. मी स्वतः सुनील कुमार आणि अश्वथनारायण यांच्याशी बोललो. कुणीही विरोधी पक्षनेता झाला तरी आम्हाला अडचण नव्हती. पण पक्षाचे हित सर्वप्रथम आहे आणि मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविणे हे ध्येय. अशी धारणा पक्षाच्या बैठकीत बोलून दाखविली.”

Karnataka LoP post also goes to Yediyurappa camp : R Ashoka is BJP pick after 6 month delay

BJP appoints Vokkaliga strongman R Ashok as Leader of Opposition in Karnataka

BJP chooses ex Dy CM R Ashoka as LoP in Karnataka Assembly

Yediyurappas son Vijayendra as Karnataka BJP president

मुलगा प्रदेशाध्यक्ष, निष्ठावंताला विरोधी पक्षनेतेपद;
येडियुरप्पा यांचा पुन्हा एकदा कर्नाटक भाजपामध्ये वरचष्मा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm