बेळगाव—belgavkar : अनोळखी तरुणाचा खून करुन मृतदेह पोत्यात बांधून मलप्रभा नदीच्या पुलाखाली फेकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मुनवळ्ळी (ता. सौंदत्ती) येथे बुधवारी ही घटना उघडकीस आला असून या प्रकरणी सौंदत्ती पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे 18 ते 22 वर्षे आहे. मारेकऱ्यांनी त्या तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात बांधून मलप्रभा नदीच्या पुलाखाली फेकून दिला आहे.
सदर मृतदेह निदर्शनास येताच विठ्ठल नरितली (रा. मुनवळ्ळी) यांनी ही माहिती सौंदत्ती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. विठ्ठल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्याची उंची 5 फूट 6 इंच, गव्हाळ वर्ण, गोल चेहरा, अंगावर निळ्या फिकट रंगाचे फूल शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट आहे. त्याच्या हातावर कन्नड भाषेत गजा आणि इंग्रजी भाषेत चेतन, मॉम, डॅड तसेच लाल रंगात बदाम आकारचे चिन्ह गोंदविलेले आहे. मृतदेह शवागारात ठेवण्यात आला असून, ओळख पटल्यास सौंदत्ती पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.