आगामी काळात लोकांना क्रेडिट कार्ड किंवा कर्ज घेताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आता बँका आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांसाठी (NBFCs) क्रेडिट कर्जाच्या जोखीम वेटेजमध्ये 25% वाढ केली आहे. याचा अर्थ असा की असुरक्षित कर्ज बुडण्याची भीती लक्षात घेता बँकांना आता पूर्वीपेक्षा 25% अधिक तरतूद करावी लागणार आहे. आत्तापर्यंत बँका आणि NBFC साठी ग्राहक कर्जाची जोखीम 100% होती, ती आता 125% पर्यंत वाढली आहे.
यापूर्वी, ऑक्टोबरच्या पतधोरणात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्राहक कर्जाच्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली होती. रिझर्व्ह बँकेने परिपत्रकात म्हटले आहे की व्यावसायिक बँकांच्या ग्राहक कर्जाच्या (थकबाकीदार आणि नवीन) जोखमीच्या वाढीमध्ये वैयक्तिक कर्जाचाही समावेश आहे. यात गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज आणि सुवर्ण कर्ज यासारख्या इतर सुरक्षित कर्जांचा समावेश नाही.
वैयक्तिक कर्जात 30% वाढ : या वर्षी सप्टेंबरपर्यंत बँकांची एकूण वैयक्तिक कर्जे 48,26,833 कोटी रुपये होती. एका वर्षात ती 30 टक्क्यांनी वाढली आहेत. या कालावधीत सामान्य कर्ज 12-14 टक्क्यांनी वाढली आहेत. अशा स्थितीत कर्ज वाढण्याचा धोका वाढू शकतो. आरबीआयने बँकांना कर्जाच्या मर्यादांचे पुनरावलोकन करण्यास सांगितले आहे.
वैयक्तिक कर्ज हे अशा प्रकारचे कर्ज आहे ज्याला कोणतीही हमी किंवा सुरक्षा आवश्यक नसते. हे कर्ज बँका किमान कागदपत्रांसह देतात. तुम्ही हे कर्ज कोणत्याही कायदेशीर आर्थिक गरजांसाठी वापरू शकता. वैयक्तिक कर्जावरील व्याजदर प्रत्येक बँकेसाठी वेगळा असतो. तुम्हाला ज्या व्याजदराने वैयक्तिक कर्ज दिले जाईल ते तुमचा क्रेडिट इतिहास, कार्यकाळ, उत्पन्न, व्यवसाय इत्यादींवर अवलंबून असते.