Maruti Chitampalli, the ‘Rishi’ Who Taught Maharashtra To Read Forestsप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारात पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री या तीन पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या सोलापूरच्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
5 नोव्हेंबर 1932 रोजी सोलापूरच्या मातीत जन्मलेल्या चितमपल्ली यांचे प्राथमिक शिक्षण भारतीय चौकातील टी. एम.पोरे विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कॉलेजात झाले. त्यांनी 36 वर्षे वनाधिकारी म्हणून सेवा बजावली. या सेवेच्या काळात व निवृत्तीच्या काळात मिळून जवळपास 65 वर्षे त्यांनी जंगल भटकंती केली. या साऱ्या आगळ्या-वेगळ्या प्रवासातून त्यांनी स्वतःला घडवित-विकसित करीत साहित्याला व जगाला फार मोठी देणगी दिली आहे. त्यांनी अत्यंत सोप्या व ओघवत्या शब्दात 20 पुस्तके लिहून साहित्य समृद्ध केले.
विशेष म्हणजे मूळ तेलुगु भाषिक असलेल्या या दि ग्रेट माणसाने एक लाख नवीन शब्दाचा खजिना मराठी साहित्याला उपलब्ध करुन दिला आहे. त्यांनी आयुष्यभर वने, वन्यजीव व्यवस्थापन,वन्यप्राणी व पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले आहे. खरेच त्यांचे कर्तृत्व हे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे आहे. त्यांनी मराठीबरोबर संस्कृतचे अध्ययन केले असून जर्मन व रशियन भाषेचा अभ्यास केला आहे. या साहित्यसेवा व कामगिरीबद्दल त्यांना विविध संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आतापर्यत त्यांनी अनेक साहित्य व अधिवेशनाची अध्यक्षपदे भूषविली आहेत. 2006 साली सोलापुरात भरलेल्या 79 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान चितमपल्ली यांना मिळाला होता.
अरण्यऋषींची प्रकृती अगदी ठणठणीत तरुणाला लाजवेल अशी आहे. शाकाहारी असलेल्या अरण्यऋषींचा दिनक्रम पहाटे चार वाजता सुरु होतो. व्यायाम व नामस्मरणानंतर नऊ वाजता नाष्टा, वृत्तपत्रे व इतर वाचन, दुपारी एक ते दोन या दरम्यान भोजन, त्यानंतर पाच वाजेपर्यंत विश्रांती, सायंकाळी पाच ते सात भेटीसाठी राखीव, रात्री दहा वाजता भोजन व झोप लागेपर्यत वाचन. वेळेवर व्यायाम, शाकाहार,फळाहार व निसर्गाचे सानिध्य आदी बाबींचे तंतोतंत पालन हे अरण्यऋषींच्या ठणठणीत प्रकृतीचे रहस्य आहे. कारण आजही त्यांचे केस काळे असून सर्व दात शाबूत आहेत. त्यांचे बोलणे-चालणे व्यवस्थित असून ते चष्माशिवाय वाचन करु शकतात हे विशेष.
ते इंटरमीजिएट सायन्स परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांना पात्रतेनुसार सदर्न फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज, कोईम्बतूर येथे वनक्षेत्रपाल पदवीसाठी प्रवेश मिळाला. 1958-60 या कालावधीत त्यांनी वनक्षेत्रपाल पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी येथील वनविभागापासून त्यांच्या नोकरीस सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी महाबळेश्वर, वडगाव (मावळ), नांदेड, इस्लामपूर, अहमदनगर वन विभागातील बोटा, अकोला तालुक्यातील राजूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेल्या नवेगावबांध, पनवेल आणि पुणे इत्यादी ठिकाणच्या वन विभागांमध्ये कामे केली. त्यांनी नांदेड येथील यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे, पुण्यातील देवळेशास्त्री, पनवेल येथील पं. गजाननशास्त्री जोशी, परशुरामशास्त्री आणि वैद्य वि. पु. धामणकरशास्त्री यांच्याकडे परंपरागत पद्धतीने संस्कृत साहित्याचे अध्ययन केले. तसेच त्यांनी जर्मन आणि रशियन या भाषांचे अध्ययन केले.