बेळगाव—belgavkar—belgaum : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला झालेल्या अपघाताचे राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. भाजपची स्थिती इतकी दयनीय झाली आहे. त्यांची कीव येते, अशी टीका आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना आमदार चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, मंत्री हेब्बाळकर यांच्या वाहनातून पैसे नेण्यात येत होते, असा आरोप भाजप नेते करत आहेत. तो पूर्णपणे खोटा आहे. भाजपमधील अंतर्गत कलह झाकून टाकण्यासाठी व राज्यातील जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा प्रयत्न आहे. नारायणस्वामी यांनी कुणाच्या दडपणाखाली असे आरोप केले आहेत हेही सांगावे.
आ. हट्टीहोळी पुढे म्हणाले, आम्ही ज्या कारने येत होतो, ती सरकारीच कार होती. सोबत गनमॅन, सरकारी चालकदेखील होते. परंतु ही कार खासगी असल्याची खोटी माहिती भाजपकडून पसरवली जात आहे. 13 जानेवारी रोजी रात्री 11 नंतर आम्ही बंगळूर सोडले. संक्रातीमुळे दुसऱ्या दिवशी पूजा करणे आवश्यक असल्याने आम्ही येत होतो. अपघातानंतर लागलीच मीच कित्तूर सीपीआयला माहिती दिली.
मंत्री हेब्बाळकरांना अधिक मार लागल्याने त्यांना रस्त्यावर टॉवेल टाकून झोपवले होते. यामुळे त्वरित उपचारासाठी रुग्णालयाकडे धाव घेतली. वाहनाचा पंचनामा केला पाहिजे. पोलिस स्थानकासमोर उभे केले पाहिजेत, यासाठी त्यावेळी आम्हाला वेळ नव्हता. घाबरल्याने त्वरित उपचारासाठी मंत्री हेब्बाळकर यांना रुग्णालयात दाखल केले. अपघानानंतर घटनास्थळावरुन गाडी हलवल्याने हा पैशांचा आरोप करण्यात येत आहे.