बेळगाव—belgavkar—belgaum : महात्मा गांधी यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मेळावा होणार आहे. मेळाव्याला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरभर फलक आणि स्वागत कमानी उभारणी करण्यात आल्या आहेत. सकाळी 10.30 वाजता सुवर्णसौध आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
QR Code डाउनलोड करा आणि पेमेंट करा
Download QR Code
त्यावेळी खर्गे, गांधी यांच्यासह मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विधानसभा अध्यक्ष यू. टी. कादर, विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह पालकमंत्री सतीश जारकीहोळी व इतर उपस्थित राहणार आहेत. सीपीएड मैदानावर आयोजित मेळावा यशस्वी करण्यासाठी राज्य प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला, उपमुख्यमंत्री शिवकुमार, मंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री के. एस. मुनियप्पा, एच.के. पाटील, रामलिंगा रेड्डी, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आदींनी बेळगावातच तळ ठोकला आहे.
काँग्रेस मेळावा आणि पुतळा अनावरणामुळे शहरात देशभरातून मान्यवर येणार आहेत. त्यामुळे शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीपीएड मैदान परिसरात सुरक्षेसाठी एक हजाराहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
बेळगावमधील शाळांना सुट्टी : काँग्रेसचा मेळावा होणार असल्याने बेळगाव शहर, ग्रामीण तालुक्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय मुलांच्या सुरक्षितेच्या द़ृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुट्टीचा आदेश काढला आहे. सध्या दहावीची पुरवणी परीक्षा सुरू आहे. मंगळवारी होणारा पेपर दि. 27 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण खात्याच्या वतीने देण्यात आली आहे.
