बेळगाव—belgavkar : कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन येत्या 4 डिसेंबरपासून बेळगावात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांतर्फे महामेळावा घेण्याचा निर्धार मराठा मंदिर येथे बुधवारी झालेल्या सभेत घेण्यात आला. तसेच या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून एकजूट दाखवून देऊ, असा विश्वास समिती नेत्यांनी व्यक्त केला.
मराठा मंदिर येथे 1 नोव्हेंबरला काळा दिनानिमित्त सभा आयोजित केली होती. या सभेच्या व्यासपीठावरून माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर आदींनी समस्त सीमावासीयांना महामेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. 2006 पासून बेळगावात कर्नाटक सरकार अधिवेशन भरवत आहे. यंदाही अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला विरोध म्हणून सीमाबांधवांच्यावतीने दरवर्षी महामेळावा आयोजित केला जातो. यंदाही महामेळाव्याचे रणशिंग काळ्या दिनाच्या व्यासपीठावर फुंकण्यात आले. महामेळाव्याच्या सभेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना पत्र पाठविले जाणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहर किणेकर यांनी यावेळी दिली.
बेळगावात सुवर्ण विधानसौध बांधून या ठिकाणी सरकारकडून अधिवेशन भरविले जात आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समितीकडून महामेळावा भरविला जातो. या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना दरवर्षी आमंत्रण दिले जाते. आतापर्यंत अनेक नेत्यांनी या महामेळाव्याला हजेरी लावून आपली भावना व्यक्त केली आहे. यंदाही महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिले जाणार आहे.