बेळगाव—belgavkar : हातगाडीवाले, बैठ्या विक्रेत्यांनी व्यापलेले बाजारपेठेतील रस्ते रहदारी पोलिसांनी सोमवारी मोकळे केले. खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्लीत ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटविल्यामुळे रस्त्यावरील रहदारीची कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. बैठे विक्रेत्यांनी तसेच हातगाडीचालकांनी रस्ते व्यापल्याने पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी अडचण येत होती. याशिवाय येथील व्यापाऱ्यांनीही आपल्या जाहिरातीचे फलक रस्त्यावर लावले होते.
याबाबत सातत्याने सूचना देऊनही व्यापारी हटत नव्हते. त्यामुळे, वाहतूक दक्षिण विभागाचे निरीक्षक विनायक बड़ीगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी सकाळी रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे बाजूला काढत रस्ते रिकामे केले. या कारवाईचे स्वागत होत असले तरी यामध्ये सातत्य राहणार का, हा प्रश्न आहे.