बेळगाव—belgavkar : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा गाजू लागला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. आता जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचाही विषय आंदोलनात उपस्थित करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने पत्राद्वारे केली आहे.
मराठा आरक्षणासाठी याआधी महाराष्ट्रात 56 विराट मूक मोर्चे निघाले आहेत. त्यापैकी कोल्हापूर, बेळगाव आणि शेवटच्या मुंबई येथील मोर्चात सीमाप्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. आता पुन्हा मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभे राहत आहे. त्यामध्ये जालना येथील मनोज जरांगे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. नुकताच त्यांनी शंभर एकरात विराट सभा घेतली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून या सभेला मराठा समाज एकत्र आला होता. या सभेत सीमाभागातूनही काही मराठा बांधव सहभागी झाले होते. त्यामुळे सीमाभागात या आंदोलनाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
मागील वेळी ज्याप्रकारे मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी मोर्चा काढताना सीमाभागातील मराठी माणसांना न्याय द्यावा, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे आताही आंदोलनात सीमावासीयांच्या मागणीचा विचार करण्यात यावा, असा विचार समोर आला आहे. त्यामुळेच शहर म. ए. समितीने याबाबत मनोज जरांगे पाटील यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे या पत्राची कशी दाखल घेतली जाणार, याबाबतही समिती नेत्यांत उत्सुकता दिसून येत आहे.