कर्नाटक : हासनमधील एकमेव धजद खासदार प्रज्वल रेवण्णा यांची खासदारकी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. JD(S) MP Prajwal Revanna हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने प्रज्वल यांना संसदेच्या कामकाजात भाग घेता येत असला तरी त्यांना मतदान करण्याचा वा खासदार म्हणून कोणतेही भत्ते घेता येणार नसल्याचे म्हटले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लढवण्यास ते पात्र आहेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
belgavkar
प्रज्वल यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि के. के. वेणुगोपाल यांनी बाजू मांडली. तर के. मंजू यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील प्रमिला नेसरगी आणि अधिवक्ता बालाजी श्रीनिवासन यांनी बाजू मांडली. या आधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्वल यांनी मतदान प्रतिज्ञापत्रात मालमत्तेसह संपूर्ण आवश्यक तपशील भरला नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी रद्द ठरवली होती. न्यायमूर्ती के. नटराजन यांनी तत्कालीन भाजप उमेदवार आणि आता धजदचे आमदार ए. मंजू आणि अन्य एका व्यक्तीने दाखल केलेल्या निवडणूक याचिकांवर हा निकाल दिला होता.
तथ्ये उघड न करणे, मालमत्तेचे मूल्य चुकीचे जाहीर करणे, कर चुकवणे, प्रॉक्सी मतदान करणे आणि निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करणे आदी कारणांचाही उल्लेख उच्च न्यायालयाच्या निकालात होता. न्यायालयाने, तथापि, याचिकाकर्ते मंजू यांना परत आलेले उमेदवार म्हणून घोषित केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले होते. याचिकाकर्ता मंजू यांनी पक्ष बदलत कर्नाटक विधानसभेची निवडणूक धजदकडून अरकलगुड मतदारसंघातून लढली आणि जिंकली होती.