बेळगाव : कर्नाटक राज्यातील वाईट सरकार जावे ही आमची इच्छा आहे. भाजप-निजदचे सरकार आल्यास आनंद आहे, असे वक्तव्य माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केली आहे. जारकीहोळी यांनी सोमवारी निजदचे नेते माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेतली. आमदार जारकीहोळी यांनी ही सदिच्छा भेट होती असल्याचा खुलासा केला. परंतु राज्यात भाजप-निजदची युती होण्याची चर्चा सुरू असून त्या पार्श्वभूमीवर जारकीहोळींनी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
belgavkar
कुमारस्वामी हे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासमवेत गुरुवारी भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. भेटीदरम्यान आमदार जारकीहोळी यांनी सुमारे तासभर कुमारस्वामी यांच्याबरोबर चर्चा केली. याबाबत माहिती देताना जारकीहोळी म्हणाले, मागील काही दिवस मी दौऱ्यावर होतो. त्यामुळे कुमारस्वामी यांची भेट झाली नव्हती. त्यांच्या आरोग्याबाबत चौकशी करण्यासाठी भेट घेतली.
राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर जारकीहोळी म्हणाले, सांगून कोणतेही सरकार पाडता येत नाही. मात्र भाजप-निजद युतीचे सरकार सत्तेवर आल्यास आनंदच होईल. दरम्यान आमदार जारकीहोळी व कुमारस्वामी गुरुवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली. भाजपच्या नेत्यांनी कुमारस्वामींना भेटीसाठी बोलावल्याचे सांगण्यात येते.