भगत सिंग यांच्याबरोबर राजगुरू आणि सुखदेव यांना 19 मार्च 1931 ला फाशी देण्यात आली. भगत सिंग यांना फाशी देण्याच्या घटनेला आज 92 वर्ष झाली आहेत. तरीही या घटनेवरून पाकिस्तानात आजही मोठा वाद होतोय. दरम्यान भगत सिंग यांना शिक्षा देण्याचा खटला लाहौर हायकोर्टात पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली जातेय. परंतु या मागणीला विरोधात केला जातोय.
दरम्यान समीक्षेच्या तत्त्वांचं पालन करून सिंग यांची शिक्षा रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आलीय. याशिवाय भगत सिंग यांना मरणोत्तर राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशीही मागणी केलीय. भगत सिंग मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज राशिद कुरैशी यांनी ही याचिका दाखल केलीय. कुरैशी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं की, अधिकारी जॉन सॉन्डर्सच्या हत्येच्या प्रकरणातील प्राथमिक तपासात भगत सिंग यांचं नाव नव्हतं. भगत सिंग यांच्या प्रकरणी सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी याप्रकरणातील 450 साक्षीदारांना न ऐकता भगत सिंग यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहौर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात येणार होती. या निर्णयावर भगत खूश नव्हते. भगत सिंग यांनी पंजाबच्या राज्यपालांना पत्र लिहून त्यांना युद्ध कैद्याप्रमाणे वागणूक द्यावी आणि फाशी देण्याऐवजी त्यांना गोळ्या घातल्या जाव्यात, अशी विनंती केली होती. दरम्यान आपल्या क्रांतिकारक सहकार्यांसोबत लिहिलेल्या शेवटच्या पत्रात भगत सिंग म्हणाले, 'मलाही जगण्याची इच्छा आहे, मला ती लपवायची नाही.' फाशीतून सुटण्याचा मोह माझ्या मनात कधीच आला नाही. मी अंतिम वेळेची आतुरतेने वाट पाहत आहे.' कुरैशी यांनी भगतसिंग यांचा खटला पुन्हा सुरू करण्यावर आणि त्याच्यावर जलद सुनावणीसाठी मोठ्या खंडपीठाच्या स्थापनेवरून उच्च न्यायालयानं प्रश्न उपस्थित केलेत. यासोबतच न्यायालयाने ही याचिका मोठ्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यायोग्य नसल्याचं म्हटलंय. ज्येष्ठ वकिलांच्या एका समितीकडून करण्यात आलेली याचिका हायकोर्टात एक दशकापासून प्रलंबित असल्याचं इम्तियाज राशिद कुरैशी यांनी सांगितलं.
न्यायमूर्ती शुजात अली खान यांनी हे प्रकरण 2013 मध्येच मोठ्या खंडपीठाच्या स्थापनेसाठी सरन्यायाधीशांकडे पाठवलं होतं. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. भगत सिंग यांनी स्वातंत्र्यासाठी लढाई केली. भगतसिंग हे केवळ शीख आणि हिंदूच नव्हे तर मुस्लिमांमध्येही आदरणीय असल्याचं कुरैशी म्हणाले. या याचिकेत पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनीही भगतसिंग यांच्याबद्दल काय म्हणाले होते याचाही उल्लेख आहे. जिना यांनी सेंट्रल सभागृहात भाषणादरम्यान भगतसिंग यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील विशेष योगदानाचा उल्लेख करून त्यांनी भगतसिंग यांना दोनदा आदरांजली वाहिली.