प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना देशात कुणी ओळखत नाही असं शक्य नाही. रतन टाटा यांच्या कार्याचे कौतुक अनेक जण करत असतात. रतन टाटा ज्यांना साथ देतात त्यांचे नशीब बदलून जाते. नव्या स्टार्टअपसाठीही रतन टाटा पुढाकार घेताना दिसतात. रतन टाटा स्टार्टअप करणाऱ्या युवकांना संधी देतात. टाटासोबत जोडलेले स्टार्टअप यशाच्या शिखरावर पोहचतात. याची अनेक उदाहरणे सध्या उपलब्ध आहेत. यातीलच एक नाव म्हणजे 21 वर्षाचा मराठी युवक, या नवोदित उद्योजकाचे नाव आहे अर्जुन देशपांडे. रतन टाटा यांनी अर्जुनला साथ दिल्यानंतर त्याच्या स्टार्टअपला गती मिळाली आणि पाहता पाहता कोट्यवधीचं साम्राज्य त्याने उभारले.
वयाच्या 16 व्या वर्षी अर्जुन देशपांडे याने लोकांना स्वस्तात औषधे मिळावी यासाठी जेनेरिक आधार स्टार्टअप सुरू केले होते. जेनेरिक औषधे बाजारातील इतर औषधांपेक्षा खूप स्वस्त असतात. रतन टाटा यांना अर्जुन देशपांडे याची कल्पना खूप आवडली. त्यानंतर टाटांनी अर्जुन यांच्या स्टार्टअपला मदत करायची ठरवली. त्यानंतर आज जेनेरिक आधार या कंपनीचे बाजारमूल्य 500 कोटींहून अधिक झाले आहे. टाटांच्या सोबतीला जेनेरिक आधारचा विस्तार इतक्या वेगाने झाला की आज जवळपास देशातील विविध शहरात 2 हजार स्टोअर आहेत. इतकेच नाही तर जेनेरिक आधार या स्टोर्सच्या माध्यमातून जवळपास 10 हजाराहून अधिक जणांना रोजगार मिळाला आहे.
विशेष म्हणजे रतन टाटा यांनी वैयक्तिक पातळीवर ही गुंतवणूक केली असून, टाटा समूहाशी तिचा संबंध नाही. याआधी टाटा यांनी ओला, पेटीएम, स्नॅपडील, क्युअरफीट, अर्बन लॅडर, लेन्स्कार्ट आणि लायब्रेट, अशा अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. एप्रिल 2023 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्जुनच्या या कार्याचे कौतुक करत त्याला फार्माचा वंडर किड असं म्हटलं. रतन टाटा यांनी जेनेरिक आधार याशिवाय रेपोस एनर्जी, गुड फेलोजसारख्या अनेक स्टार्टअपला सहाय्य केले आहे. अर्जुन देशपांडे याने 2018 साली ‘जेनरिक आधार’ची सुरुवात केली होती. त्याची कंपनी थेट उत्पादकांकडून जेनरिक औषधी खरेदी करते आणि किरकोळ विक्रेत्यांना विकते. त्यातून घाऊक विक्रेत्याचे 16 ते 20 टक्क्यांचे कमिशन वाचते.