कोल्हापुरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर; आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली तोडफोड. कोल्हापुरात थोड्याच वेळात इंटरनेट सेवा बंद होणार? लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या;कोल्हापूर : सोशल मीडियातून आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते छत्रपती शिवाजी चौकात जमून संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. काही कार्यकर्त्यांनी बिंदू चौक आणि गंजी गल्ली परिसरात परिसरात दगडफेक केल्याने पोलिसांना जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. बिंदू चौक, अंबाबाई मंदिर परिसर, महाद्वार रोड या परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियातील आक्षेपार्ह स्टेटस आणि मेसेज प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज, बुधवारी कोल्हापूर शहर बंदची हाक दिली आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली. आक्षेपार्ह स्टेटस ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणार्यांवर कडक कारवाईची मागणी केली.
belgavkar
तसेच पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 400 ते 500 तरुण गंजी गल्लीत घुसल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. गंजी गल्ली आणि बिंदू चौकात काही घरांवर दगडफेड झाल्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. जमाव नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक झाली. शहरातील केएमटी बससेवा, प्रवासी रिक्षा वाहतूकही बंद आहे. परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बोलवले असून, सध्या पोलिस अधिकारी आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये बैठक सुरू आहे. दरम्यान, बिंदू चौकात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. एसआरपीएफ, दंगल काबू पथकासह, सुमारे एक हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना इंटरनेट बंद (Internet Service) करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित (Mahendra Pandit) यांनी दिली आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाबंदीचे आदेश असताना या संघटनांनी मोर्चा काढला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत