Maharashtra Premier League : आयपीएल 2023 चा थरार संपला असून भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय कर्तव्यावर रूजू झाले आहेत. अशातच महाराष्ट्रातील क्रिकेटपटूंना नवं व्यासपीठ मिळावं यासाठी महाराष्ट्र प्रीमिअर लीगची स्पर्धा सुरू होत आहे. IPL च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या लीगमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेळाडूंना स्वत : ला सिद्ध करण्याचं नवं व्यासपीठ मिळणार आहे. यामध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेले खेळाडू केदार जाधव, राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांचाही सहभाग असणार आहे. 15 ते 29 जून या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये हा थरार रंगेल.
belgavkar
दरम्यान, आगामी स्पर्धेसाठी लिलाव प्रक्रिया पार पडली ज्यात कोल्हापूरच्या शिलेदाराने सर्वाधिक भाव खाल्ला. कोल्हापूर टस्कर्सने नौशाद शेखवर सर्वाधिक 6 लाख रुपयांची बोली लावली. लक्षणीय बाब म्हणजे लिलावादरम्यान सर्व संघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.MPL मधील सहा संघांची नावे जाहीरखरं तर सुहाना मसालेवालेंचा असलेला पुण्याचा संघ 'पुणेरी बाप्पा' नावाने ओळखला जाईल. तर ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल. तसेच पुनित बाल समूहाचा संघ 'कोल्हापूर टस्कर्स', ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ 'ईगल नाशिक टायटन्स', वेंकटेश्वरा समूहाचा संघ 'छत्रपती संभाजी किंग्ज' आणि जेटस सिंथेसिसचा संघ 'रत्नागिरी जेटस' तसेच कपिल सन्सचा संघ 'सोलापूर रॉयल्स' अशा नावाने ओळखला जाईल.
नौशाद शेखवर सर्वाधिक बोली लागली आणि सहा लाख रूपयांमध्ये कोल्हापूरच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. त्यापाठोपाठ दिव्यांग हिंगणेकरला रत्नागिरी जेटसने 4 लाख 60 हजार रूपयांत आपल्या संघात घेतले. तसेच रत्नागिरीच्या संघाने साहिल औताडे (3 लाख 80 हजार), अंकित बावणे (2 लाख 80 हजार) यांना देखील आपल्या संघात घेतले.
सत्यजित सोलापूरच्या ताफ्यात : ग्रामीण भागातील नामांकित खेळाडू असलेल्या सत्यजित बच्छावला 4 लाख 60 हजार रुपयांत सोलापूरच्या संघाने खरेदी केले. शमशुझमा काझीला (2 लाख 80 हजार) छत्रपती संभाजीनगर किंग्ज, सिद्धेश वीरला (2 लाख 60 हजार), आशय पालकर आणि कौशल तांबेला (प्रत्येकी 2 लाख 40 हजार) ईगल नाशिक टायटन्सने आपल्या ताफ्यात घेतले. पुणेरी बाप्पा संघाने सुरज शिंदेसाठी 2 लाख 40 हजार रूपये मोजले, तर 2 लाखांची बोली लावून रोहन दामलेला आपल्या ताफ्यात घेतले.
लिलावासाठी 300 हून अधिक खेळाडू रिंगणात होते. यामध्ये अ, ब आणि क अशा तीन गटात खेळाडूंचे विभाजन करण्यात आले होते. अ गटातील खेळाडूंची मूळ किंमत 60 हजार, 19 वर्षांखालील आणि ब गटातील खेळाडूंसाठी 40 हजार आणि क गटासाठी 20 हजार रुपये एवढी मूळ किंमत होती. खेळाडूंना खरेदी करण्यासाठी 6 फ्रँचायझींना 20 लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली होती. प्रत्येक फॅंचायझीला 16 खेळाडू खरेदी करण्याची मुभा होती. यामध्ये 19 वर्षांखालील दोन खेळाडू असणे अनिवार्य होते. उल्लेखनीय म्हणजे 19 वर्षांखालील गटातून सचिन धस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोल्हापूरच्या फ्रँचायझीने त्याच्यासाठी 1 लाख 50 हजार रूपये मोजले.
महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे आयकॉन खेळाडूपुणेरी बाप्पा - ऋतुराज गायकवाड कोल्हापूर टस्कर्स - केदार जाधव ईगल नाशिक टायटन्स - राहुल त्रिपाठी छत्रपती संभाजी किंग्ज- राजवर्धन हंगरगेकर रत्नागिरी जेट्स- अझीम काजी सोलापूर रॉयल्स - विकी ओस्तवाल