बेळगाव : आश्वासनाप्रमाणे सर्व 5 हमी योजनांची अंमलबजावणी केली जाईल. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. त्याबरोबरच विकासासाठी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन आवश्यक आहे. त्याबाबतही काँग्रेस सरकार योग्य तो निर्णय घेईल, असेही म्हणाल्या.
belgavkar
मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगाव जिल्हा विभाजनाची मागणी 1995 पासून होते आहे. बेळगाव हा बंगळूरनंतरचा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. प्रशासकीयदृष्ट्या इतका मोठा जिल्हा सांभाळणे अवघड तसेच विकासकामे राबवणे सहज शक्य होत नाही. त्यामुळे बेळगावचे विभाजन करून बेळगाव आणि चिकोडी असे दोन जिल्हे करावेत, ही मागणी गेली 28 वर्षे होत आहे. तथापि, जिल्ह्यातीलच काही नेत्यांचा विभाजनाला विरोध आहे. तर काही नेत्यांची मागणी दोन नव्हे, तर तीन जिल्हे करावेत अशी आहे. बेळगाव, गोकाक आणि चिकोडी असे तीन नवे जिल्हे बनवावेत, अशी मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन रखडले आहे. विकासाच्यादृष्टीने जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे. ही मागणी जुनीच आहे. याबाबत आमचे सरकार योग्य निर्णय घेईल.
काँग्रेसने दिलेल्या पाच आश्वासनांची पूर्तता लवकरच होणार आहे. निवडणुकीपूर्वी भाववाढीने त्रस्त बनलेल्या जनतेला दिलेली आश्वासने आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करत आहोत. गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज मागवण्यासाठी आम्ही अधिकार्यांशी चर्चा केली आहे. कोणताही संभ्रम न ठेवता ही योजना राबविली जाईल. भाजप काळात दरवाढीने अडचणीत आलेल्या जनतेने काँग्रेसला साथ दिली आहे. आश्वासने पूर्ण करण्यात येतील. तोपर्यंत थोडा संयम ठेवावा लागेल, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.