कर्नाटक-बंगळुरू : एका फ्लॅटमध्ये 23 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. ही तरुणी एका खासगी कंपनीत कामाला होती. तिच्या 27 वर्षीय माजी लिव्ह-इन पार्टनरने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या तरुणासोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला आहे. आकांक्षा असं मृत तरुणीचं नाव असून ती मूळची हैदराबादची रहिवासी आहे. तर संशयित आरोपी असलेला अर्पित दिल्लीचा रहिवासी आहे. तो एका ग्लोबल एड-टेक कंपनीत कार्यरत आहे. आकांक्षाची रुममेट अपार्टमेंटमध्ये परतल्यानंतर घटना उघडकीस आली. रुममेटला आकांक्षा मृतावस्थेत दिसली.
belgavkar
आकांक्षा आणि अर्पितची ओळख चार वर्षांपूर्वी एड-टेक कंपनीत झाली. तिथे ते एकत्र काम करायचे. आकांक्षा इंजिनीअर, तर अर्पित बी. कॉम ग्रॅज्युएट आहे. त्या दोघांनी एकत्र राहण्यास सुरुवात झाली. मात्र लवकरच त्यांच्याच खटके उडू लागले. यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. मात्र अर्पित आकांक्षाला भेटायला यायचा. सोमवारी अर्पित आकांक्षाला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अर्पितनं आकांक्षाची गळा आवळून हत्या केली. आकांक्षाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत लटकवण्याचा प्रयत्न अर्पितनं केला. मात्र त्यात त्याला अपयश आलं. त्यामुळे त्यानं आकांक्षाचा मृतदेह जमिनीवरच ठेवला आणि अपार्टमेंट लॉक करुन तिथून पळून गेला.
या प्रकरणी बंगळुरूतील भीमानगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अर्पितच्या शोधासाठी चार पथकं तयार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त एम. चंद्रशेखर यांनी दिली. आकांक्षाच्या मित्रांचीदेखील चौकशी सुरू आहे.