बाप हा बाप असतो...! पोराचं नाव मृतांमध्ये पण शवगृहातून त्याला जिवंत शोधून काढलं

बाप हा बाप असतो...!
पोराचं नाव मृतांमध्ये पण शवगृहातून त्याला जिवंत शोधून काढलं

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुलाचा शोध घेण्यासाठी तात्काळ बालासोर गाठलं.

ओडिशामधील (Odisha) बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये (Railway Accident) अनेक मन हेलावून टाकणारी दृश्य समोर आली आहेत. लोकांनी आपली माणसं शोधण्यासाठी पूर्ण आकाशपाताळ एक करत आहे. मृतदेहांच्या ढिगाऱ्यामध्ये कोणी आपला मुलगा शोधत आहे तर कोणी आपला भाऊ शोधत आहे. परंतु या सगळ्यामध्ये असेही काही लोक आहेत ज्यांनी आपलं माणूस सापडेल ही आशा मावळू दिली नाही. असाच एक प्रसंग बालासोरच्या शवगृहामध्ये पाहायला मिळाला. तुमचा मुलगा जिवंत नाही, असे बहुतांशी कर्मचारी, प्रशासन सांगत असताना दुसरीकडे आपल्या पोटचा गोळा सुखरुप असल्याचा विश्वास मनात असणाऱ्या बापाने मुलाला शवगृहातून त्याला जिवंत बाहेर काढले.  कोरोमंडल एक्सप्रेसमधून विश्वजीत मलिक नावाचा 24 वर्षीय तरुण प्रवास करत होता. परंतु या अपघातात त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यावर त्याच्या वडिलांनी विश्वास ठेवला नाही आणि आपल्या मुलाला शोधून काढलचं.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या मुलाला शोधून काढण्यासाठी वडिलांनी कोलकातावरुन 230 किमीचा प्रवास करुन बालासोर गाठलं. तिथे त्यांना त्यांचा मुलगा एका शवगृहात जिवंत सापडला. त्यानंतर त्यांनी त्याला पुढील उपचार करण्यासाठी कोलकत्याला परत नेले.  हेलाराम मलिक यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवला नाही. विश्वजीतची या अपघातनंतर एसएसकेएम या रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याची पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात येईल. विश्वजीत या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. परंतु आता त्याची प्रकृती स्थिर आहे. हावडामध्ये दुकानदार असलेल्या हेलाराम मलिक यांनी शुक्रवारी (2 जून) रोजी विश्वजीतला रेल्वे स्थानकावर सोडल्यावर काही तासानंतर त्यांना या घटनेबद्दलची माहिती समजली.  त्यानंतर त्यांनी विश्वजीतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पलीकडून त्यांना फक्त आक्रोश ऐकायला मिळाला. यानंतर हेलाराम हे एक स्थानिक रुग्णवाहिका चालक पलाश पंडित आणि त्यांचे मेहुणे दीपक दास यांच्यासोबत तात्काळ बालासोरसाठी रवाना झाले. त्यांनी त्या रात्री 230 किमीचा प्रवास केला. पण त्यांना त्यांचा मुलगा कोणत्याही रुग्णालयात सापडला नाही. 
डोळ्यांसमोर होते अनेक मृतदेह : दास यांनी सांगितलं की, 'आम्ही ही सगळी परिस्थिती पाहून देखील हार नाही मानली. आम्ही त्याच्या विषयी इतर लोकांकडे चौकशी केली. एका व्यक्तीने आम्हाला सांगितले की जर तुम्हाला रुग्णालयात तुमचा व्यक्ती भेटला नसेल तर तुम्ही शवगृहात जायला हवे. आम्हाला सुरुवातीला ही गोष्ट मान्य करण्यास वेळ लागला पण आम्ही शवगृहात विश्वजीतला शोधण्यासाठी गेलो. तिथे आमच्या डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच पडला होता. परंतु आम्हाला मृतदेहांच्या जवळ जाण्यास परवानगी नव्हती.'
विश्वजीत कसा सापडला?
दास यांनी पुढे म्हटलं की, 'थोड्या वेळाने कोणीतरी पाहिले की तिथल्या एका मृतदेहाचा हात हलत आहे. त्यानंतर मात्र शवगृहात एकच गोंधळ उडाला. आम्ही तिथेच असल्यामुळे ही सर्व घटना पाहत होतो. जेव्हा आम्ही तो हात हलताना पाहिले तेव्हा आमच्या लक्षात आले की ही हात विश्वजीतचाच आहे.
विश्वजीत तेव्हा गंभीर जखमी होता आणि पूर्णपणे बेशुद्ध होता. आम्ही तात्काळ त्याला रुग्णवाहिकेमधून बालासोरच्या रुग्णालयात आणले. त्यानंतर तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याची अवस्था पाहून आम्हाला त्याला कटकच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला परंतु आम्ही त्याला आमच्या सोबत घेऊन आलो.'  ओडिशामध्ये झालेला हा रेल्वे अपघात रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात मानला जात आहे. या अपघातात अनेक लोकांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना गमावले. परंतु विश्वजीतच्या वडिलांसारखे अनेक लोक अजूनही आपल्या माणसांच्या शोधात आहेत. 

refused to believe his son was dead hours later he found him alive in a morgue

Adani Group announces help for children of Odisha train crash

Odisha Train Accident Balasore Train Accident : West Bengal Man Travels To Odisha On Ambulance To Save Son

बाप हा बाप असतो...! पोराचं नाव मृतांमध्ये पण शवगृहातून त्याला जिवंत शोधून काढलं
मुलाचा शोध घेण्यासाठी तात्काळ बालासोर गाठलं.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm