jayesh-pujari-kantha-threatened-nitin-gadkari-in-connection-with-pfi-18-lakhs-spent-on-luxuries-in-jail-202305.jpeg | बेळगावच्या हिंडलगा जेलमधून गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी PFIशी संबंधीत; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगावच्या हिंडलगा जेलमधून गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी PFIशी संबंधीत;

belgavkar.com | belgaum | belgavkar

तुरुंगात ऐशोआरामासाठी अदृश्य शक्तींकडून 18 लाख खर्च


नागपूर (महाराष्ट्र) : मागच्या काही महिन्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात असलेला जयेश पुजारी देत असल्याचं पोलिस तपासातून समोर आलेलं आहे. हा जयेश पुजारी पीएफआयशी संबंधीत असल्याची माहिती पुढे येत आहे. शिवाय तुरुंगात त्याच्यावर अदृश्य शक्तींकडून 18 लाख खर्च झाल्याचं सांगण्यात येतंय. नितीन गडकरी यांना मागील काही दिवसांमध्ये तीन ते चार वेळा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आलेल्या आहेत. तुरुंगातून धमकी देणारा जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी सध्या नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यानेच नितीन गडकरी यांना तुरुंगातून धमकी दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे. तो बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रागातून त्याने गडकरींना धमकी दिली, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली आहे. शिवाय पोलिस तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत. जयेश पुजारी याला तुरुंगामध्ये नियमित मांसाहार, बेड, मोबाईल फोन मिळायचा. शिवाय मारहाण न करण्यासाठी अदृश्य शक्ती काम करत होती. जयेशवर आतापर्यंत 18 लाख रुपये खर्च झाल्याचं पुढे येत आहे. 'पीएफआयवर बंदी लावली जाते मग आरएसएसवर बंदी का नाही' असा उलट सवाल त्याने पोलिसांना केला आहे. त्यावरुन त्यांचं ब्रेन वॉश झाल्याचं स्पष्ट होतंय.
पीएफआयचे मोहम्मद अफसर पाशा, नासिर, फारुख यांनी जयेशचं ब्रेन वॉश केल्याचं तपासातून पुढे आलेलं आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या ताब्यात असलेला जयेश आता फक्त गुंड राहिलेला नसून दहशतवाद्यांच्या हातचं खेळणं झालेला आहे. नितीन गडकरी यांना त्याने तुरुंगातून धमकी दिल्याने जयेशबद्दल ही माहिती उघड झालेली आहे. दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात एक कॉल आला होता. गडकरी यांना आलेल्या धमकीमुळे राज्यातील यंत्रणा सतर्क झाली होती. 21 मार्च रोजी परत सकाळी नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली होती. पुन्हा एकदा गडकरी यांना जयेश पुजारी या नावानेच धमकी आली होती.
फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. दरम्यान या प्रकरणात नागपूर पोलिसांनी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागणे व धमकी देणे असा गुन्हा दाखल केला. तसेच नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाले होते. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी मंगळुरु येथील रजिया नावाच्या तरुणीला ताब्यात घेतले आहे. तसेच गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा फोन आणि रजियाला करण्यात आलेला फोन हे दोन्ही फोन कॉल बेळगावच्या हिंडलगा तुरुंगामधूनच झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली होती. गुन्हे शाखेसह धंतोली पोलिसांचे पथक त्याच्या चौकशीसाठी बेळगाव येथील कारागृहात गेले होते. पोलिसांनी त्याची भेट घेत चौकशीही केली होती. त्यावेळी त्याच्याकडून अनेक व्हीआयपींची नावे असलेली डायरी आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली होती.