man-invented-unique-inflatable-t-shirt-designed-for-kids-anand-mahindra-tweet-video-202305.jpeg | लहान मुलं पाण्यात बुडू नयेत यासाठी तरुणाने बनवला अनोखा टी-शर्ट; | belgaum news | belgavkar बेळगावकर

लहान मुलं पाण्यात बुडू नयेत यासाठी तरुणाने बनवला अनोखा टी-शर्ट;

belgavkar.com | belgaum | belgavkar

आनंद महिंद्रांनी Video पोस्ट करत केलं कौतुक, म्हणाले…

तर हा टी-शर्ट घातलेलं मूल पाण्यात पडलं तरी ते बुडणार नाही.


लहान मुलं स्वभावाने खूप खोडकर असतात. अनेकदा ती खेळता खेळता आपला जीव धोक्यात घालतात. आई-वडिलांनी काही गोष्टी सांगूनही लहान मुलं ऐकत नाहीत. यामुळे काही वेळा ती अशा धोकादायक गोष्टी करत असतात ज्याची त्यांनाही कल्पना नसते. अनेकदा खड्ड्यात पडून पाण्यात बुडून लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच. ‘नदीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या चिमुरडीचा / चिमुरड्याचा बुडून मृत्यू’ अशा हेडलाईन्सने बातमी असते. या बातम्या वाचताना अंगावर काटा येतो. या वेळी या निष्पाप मुलांच्या रक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे, अशी भावना निर्माण होते. पण काय करावं, असा प्रश्न सतावतो. पण याच प्रश्नावर अडून न राहता एका तरुणाने पुढाकार घेतला आहे. यामुळे लहान मुलांना बुडण्यापासून वाचवण्याचा एक उत्तम मार्ग सापडला आहे, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या तरुणाचे कौतुक करत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे जो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या तरुणाने लहान मुलं पाण्यात बुडू नये यासाठी एक अनोखा टीशर्ट तयार केला आहे. ही संकल्पना आनंद महिंद्रा यांना खूपच आवडली आहे. त्यांनी तरुणाने तयार केलेल्या अनोख्या टी-शर्टचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, या शोधाला नोबेल पारितोषिक मिळू शकत नाही. पण माझ्यासाठी तो कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे. कारण दोन मुलांचा आजोबा या नात्याने त्यांची सुरक्षितता माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 1 मिनिट 1 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरुणाने एक इन्फ्लेटेबल फुगवलेला टी-शर्ट डिझाइन केला असून तो त्याचा डेमो देत आहे. या वेळी त्याच्यासमोर पाण्याने भरलेला एक चौकोनी आकाराचा टँक ठेवला आहे. या वेळी तो तरुण मुलाचा डमी घेतो आणि त्याला टी-शर्ट घालून पाण्यात टाकतो. ज्यानंतर जे घडतं ते एका जादूप्रमाणे असतं… पाण्यात टाकलेला डमी बुडण्याऐवजी तो पाण्यावर तरंगतो, कारण टी-शर्टच्या कॉलरच्या भागात अशी वस्तू बसवली आहे, जी पाण्याखाली गेल्यावर उघडते आणि डमीला बुडू देत नाही. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे फार उपयुक्त जॅकेट आहे. जे घातल्याने लहान मूल खोल पाण्यात पडलं तरी बुडणार नाही.

युनिक टी-शर्टची डेमो क्लिप पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स त्या तरुणाचं खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने कौतुक करत लिहिलं की, ही एक अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. तर दुसरा एक यूजर म्हणाला की, या इनोव्हेशनने मुलं बुडण्यापासून वाचतील आणि पोहणंही सहज शिकू शकतील. या व्हिडीओला आतापर्यंत लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच हजारो लोकांनी लाइकही केलं आहे. पण तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.