food-inspector-pumped-lakhs-of-liters-water-from-dam-expensive-mobile-phone-202305.jpg | किती ही मस्ती...! अधिकाऱ्याचा फोन पडला बंधाऱ्यात; 3 दिवस 30 एचपी पंपाने नासवलं पाणी | belgaum news | belgavkar बेळगावकर

किती ही मस्ती...!
अधिकाऱ्याचा फोन पडला बंधाऱ्यात;
3 दिवस 30 एचपी पंपाने नासवलं पाणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बंधाऱ्यात या अधिकाऱ्याचा महागडा स्मार्टफोन पडला


सरकारी अधिकाऱ्यांच्या मुजोर वर्तवणूकीमुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागल्याच्या घटना बऱ्याचदा पाहायला मिळतात. स्वतःच्या फायद्यासाठी अनेकदा सरकारी अधिकारी नियम धाब्यावर बसवतात. असाच एक संतापजनक प्रकार छत्तीसगड येथे समोर आला आहे. एका अन्न निरीक्षक अधिकाऱ्याने त्याचा पाण्यात पडलेला महागडा मोबाईल परत मिळवण्यासाठी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी उपसल्याचा प्रकार समोर आला आहे. एका फोनच्या निमित्तानं त्याने तब्बल दीड हजार एकर शेतीस पुरेल एवढं पाणी वाया घालवल्याने संताप व्यक्त केला जात आहे. महत्वाचं म्हणजे हे पाणी उपसल्यानंतर अधिकाऱ्याला त्याचा महागडा फोन सापडला, मात्र तो तेव्हा खराब झाल्याचं आढळून आलं.
छत्तीसगड मधील कांकेरच्या कोयलीबेडा ब्लॉकचे अन्न अधिकारी रविवारी सुट्टी घालवण्यासाठी खेरकट्टा परळकोट जलाशय येथे पोहोचले होते. खेरकट्टा पर्लकोट जलाशयाच्या ओव्हर ब्रिजवर 15 फुटांपर्यंत भरलेल्या बंधाऱ्यात या अधिकाऱ्याचा महागडा स्मार्टफोन पडला. या अधिकाऱ्याने मोबाईल शोधण्याच्या कामात गावातील लोकांना लावलं. अनेकांनी प्रयत्न करून देखील मोबाईल सापडला नाही. यानंतर फोन बाहेर काढण्यासाठी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करण्यात आली. यानंतर 30 एचपीचा पंप लावून जलाशयातील पाणी बाहेर उपसण्यात आलं. पाणी काढण्यासाठी तीन दिवस पंप चालू होता.
पाणी उपसलं जात असल्याची बातमी समजताच सिंचन विभागातील अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले. यानंतर पंप बंद करण्यात आला. यानंतर पुन्हा मोबाईलचा शोध सुरू झाला आणि अखेर मोबाईल सापडला. पण तो खराब झाला होता. माहितीनुसार मागील सोमवार ते गुरूवार सलग 24 तास 30 एचपीचे दोन डिझेल पंप वापरून तब्बल 21 लाख लीटर पाणी वाया घालवण्यात आलं. इतकं पाणी वापरून दीड हजार एकर जमीनीला पाणी देता आलं असतं.
आता या घटनेनंतर त्या मोबईलमध्ये असं होतं तरी काय असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. तसेच या प्रकरणी 5 फूट पाणी उपसण्याची तोंडी परवानगी देण्यात आली होती. मात्र 10 फूट पाणी जास्त उपसण्यात आले. दरम्यान या महागड्या फोनची किंमत परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या उपजीविकेपेक्षा मोठी होती का? कडाक्याच्या उन्हाळ्यात मौल्यवान पाणी का वाया घालवण्यात आलं असा प्रश्न विचारला जात आहे. अधिकाऱ्यानं मोबाईल शोधण्यासाठी 21 लाख लीटर पाण्याची नासाडी केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. याची दखल उत्तर बस्तर कांकेरच्या जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी घेतली. त्यांनी राजेश विश्वास यांच्या निलंबनाचे आदेश दिले. 'पंखाजूरचे खाद्य निरीक्षक राजेश विश्वास यांनी त्यांचा मोबाईल शोधण्यासाठी सलग 4 दिवस परलकोट जलाशयातून जवळपास 21 लाख लीटर पाणी डिझेल पंपाच्या माध्यमातून उपसलं. या प्रकरणाची चौकशी पखांजूरच्या एसडीएम यांनी केली. कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय त्यांनी जलाशयातून 41 हजार 104 पाणी उपसलं. उन्हाचा कडाका वाढता असताना त्यांनी लाखो लीटर पाणी वाया घालवलं. त्यासाठी पदाचा गैरवापर केला. त्यांचं वर्तन स्वीकारार्ह नाही,' असं शुक्ला यांनी आदेशात म्हटलं आहे.