बेळगाव : बेळगावसह (Belgaum) उत्तर कर्नाटकातील (North Karnataka) काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळ, विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने (Meteorology Department) वर्तविली आहे. शुक्रवारी वादळ व पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रतितास 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहणार असल्याचेही हवामान खात्याने कळविले आहे. बेळगाव, गदग, हावेरी, रायचूर, यादगीर या जिल्ह्यांसाठी हा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यानी केले आहे.
30 मे रोजीही मेघगर्जनेसह वादळी वारा व पाऊस (Rain) होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण त्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात पाऊस होणार नाही. बागलकोट, बिदर, गुलबर्गा, रायचूर, विजापूर व यादगीर जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे. त्यामुळे बेळगावकरांना केवळ शुक्रवारी खबरदारी घेण्याची गरज आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उन्हाळ्यात वळीव पावसाचे प्रमाण कमी आहे.
सोमवारी बेळगाव शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे जीवितहानी झालेली नाही. पण, हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय काही खासगी व सार्वजनिक मालमत्तांचे नुकसानही झाले आहे. सोमवारी पावसाचे प्रमाण कमी होते, पण वादळी वारे मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे झाडे, विद्युत खांब उन्मळून पडले. त्यानंतर प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यास सुरूवात झाली आहे. हवामान खात्याकडून वादळी वारे व पाऊस पडणार असल्याची माहिती मिळाल्यावर लगेचच नागरीकांना सतर्क केले जात आहे.