BGMCCB.jpg | बेळगाव : थकबाकी गाळेधारकांना मनपाची नोटीस | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : थकबाकी गाळेधारकांना मनपाची नोटीस

belgavkar.com | belgaum | belgavkar

31 मार्चपूर्वी भाडे भरा, अन्यथा कारवाई करू;


बेळगाव : महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र अनेक गाळेधारकांनी भाड्याची रक्कम जमा केली नाही. महात्मा फुले भाजीमार्केट आणि गोवावेस येथे व्यापारी संकुलातील लाखांच्यावर थकबाकी असलेल्या गाळेधारकांना मनपाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. 31 मार्चपूर्वी भाडे भरा, अन्यथा कारवाई करू, असा इशारा नोटिसीद्वारे देण्यात आला आहे.
महापालिकेच्या विविध व्यापारी संकुलांमध्ये 450 हून अधिक गाळे असून सर्व गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. काही ठिकाणी खुल्या जागादेखील भाडेतत्त्वावर देऊन भाडे आकारणी केली जाते. महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी गाळे आणि खुल्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. मात्र भाडेकरू वेळेवर भाड्याची रक्कम भरणा करीत नसल्याने महापालिकेला महसुलावर पाणी सोडण्याची वेळी आली आहे. गोवावेस व्यापारी संकुलातील तसेच महात्मा फुले भाजी मार्केटमधील काही गाळेधारकांनी गेल्या कित्येक वर्षांपासून भाड्याची रक्कम महापालिकेला भरली नाही. सातत्याने सूचना करूनदेखील भाडे भरण्यास टाळाटाळ केली आहे. काही भाडेकरूंची रक्कम लाख ते तीन लाखापर्यंत थकली आहे. त्यामुळे लाखाच्यावर थकबाकी असलेल्या गाळेधारकांना मनपाच्या महसूल विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वीदेखील नोटीस बजावून भाडे भरण्याची सूचना केली होती. पण या नोटिसीकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे आता पुन्हा नोटिसा बजावून 31 मार्चअखेर भाडे भरा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा देण्यात आला आहे.
31 मार्चपर्यंत भाडे जमा न केल्यास कायदेशीर कारवाई करून गाळ्यांचा ताबा घेतला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वी गाळे रिकामी करण्यापूर्वीच दुसऱ्या भाडेकरूंना गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने लिलाव प्रक्रिया राबविली होती. पण लिलाव झाल्यानंतर सर्वाधिक बोली लागलेल्या गाळेधारकांना अद्यापही गाळ्याचा ताबा मिळालेला नाही. गाळे रिकामी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. भाड्याची रक्कम जमा न केल्यास गाळे रिकामी करून भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित केला जाणार आहे.