BGMCCB.jpg | बेळगाव : घरपट्टी वाढणार.? बेळगाव महापालिका | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : घरपट्टी वाढणार.?
बेळगाव महापालिका

belgavkar.com | belgaum | belgavkar

आता नगरप्रशासन खात्याने महापालिकेला पत्र पाठवून घरपट्टी वाढीच्या सूचना;
31 मार्चअखेरपर्यंत घरपट्टीवाढीचा प्रस्ताव


बेळगाव : बेळगाव महापालिका अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. त्यामुळे लोक समाधान व्यक्त करत असतानाच आता नगरप्रशासन खात्याने महापालिकेला पत्र पाठवून घरपट्टी वाढीच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापौर, उपमहापौरांची कोंडी झाली असून घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावर आठवड्याने निर्णय घ्यावा लागणार आहे. दर 3 वर्षांनी 15 ते 30 टक्के घरपट्टी वाढ करण्यात येते. पण, गतवर्षी शासनाने नवे बदल केले आहेत.
उपनोंदणी खात्याच्या दरानुसार मालमत्तेची किंमत करून त्यावर घरपट्टी आकारण्याची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी ठरणार्‍या उपनोंदणीच्या दरानुसारच घरपट्टी निश्चित करण्याची सूचना केली आहे. प्रत्येक वर्षी तीन ते पाच टक्क्यांपर्यंत घरपट्टीत वाढ करण्याची तरतूद कायद्यात केली आहे. त्यामुळे मागील वर्षीपासून नव्या मार्गसूचीनुसार घरपट्टी वाढ करण्यात येत आहे. यंदादेखील या मार्गसूचीनुसार घरपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली आहे.
31 मार्चअखेरपर्यंत घरपट्टीवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश बजावला आहे. 1 एप्रिलपासून वाढीव घरपट्टीची आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत घरपट्टीवाढीचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे महापालिका प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे घरपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. एकीकडे कोणतीही करवाढ करणार नाही, अशी ग्वाही दोन्ही आमदारांनी दिली. त्यावर महापौर, उपमहापौरांनी अर्थसंकल्पात शिक्कामोर्तब केले. पण, आता नगरप्रशासन खात्यानेच वाढीव घरपट्टीसाठी तगादा लावला आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौरांची गोची झाली आहे.