बेळगाव : साडेसात लाख रुपयांचा मद्यसाठा उद्यमबाग पोलिसांनी जप्त केला, एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

गोव्याहून खानापूरमार्गे बेळगावमध्ये प्रवेश करताना मजगाव येथे अडविले


बेळगाव : गोवा बनावटीचा साडेसात लाख रुपयांचा मद्यसाठा उद्यमबाग पोलिसांनी आज जप्त केला. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून, परशुराम भाऊराव पेडणेकर (रा. होसूर बसवाण गल्ली) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मजगाव येथील रेल्वेफाटक क्रमांक पाच येथून बेकायदा दारुची वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती उद्यमबाग पोलिसांना मिळाली होती.
त्यामुळे पथकाची स्थापना करून वाहनांची तपासणी केली जात होती. या दरम्यान, गोव्याहून खानापूरमार्गे बेळगावमध्ये प्रवेश करत असलेल्या वाहनाला अडविण्यात आले. तसेच गाडीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 7 लाख 52 हजार 160 रुपयांचा मद्यसाठा सापडला आहे. पोलिसांनी मद्यसाठा जप्त करुन संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलिस आयुक्त अरुणकुमार कोलूर, पोलीस निरीक्षक आर. एस. बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून भरारी पथकाकडून जोरदार कारवाई सुरु असून रोख रक्कम, साहित्य आणि मद्यसाठा मोठ्या स्वरूपात जप्त करण्यात येत आहे. त्यामध्ये उद्यमबाग परिसरात सुमारे साडेसात लाख रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी अॅक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे.