वर्ष 2023 सुरू होताच अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संस्थेच्या अदानी समूहावर आलेल्या अहवालानंतर भारतात एकच खळबळ उडाली. अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे शेअर प्रचंड प्रमाणात घसरले. अदानी समूहाला गुंतवणूकदारांचा तसेच देशवासीयांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी धोरणांमध्ये अनेक बदल करावे लागले. काही बड्या करारातून माघार घ्यावी लागली. अद्यापही अदानी समूह या प्रचंड मोठ्या तडाख्यातून सावरलेला दिसत नाही. हिंडेनबर्गचा अहवाल अदानी समूहाने फेटाळला. दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले. विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारला या प्रकरणी घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. सेबीनेही अदानी समूहातील कंपन्यांचा आढावा घेतला. यानंतर आता हिंडेनबर्ग संस्था लवकरच नवीन एक नवा रिपोर्ट प्रसिद्ध करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हिंडनबर्ग रिसर्चने ट्विट करत ही माहिती दिली आहे. लवकरच नवा रिपोर्ट, दुसरा मोठा दिग्गज, असे ट्विट हिंडेनबर्ग संस्थेकडून करण्यात आले आहे. अमेरिकेत बॅंकांसंदर्भात हा रिसर्च असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या ट्विटनंतर सर्वांचे लक्ष आता हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टकडे आहे. गौतम अदानी समूहाविषयी केलेल्या खुलाशानंतर आता हिंडनबर्ग रिसर्चने नवा खुलासा करण्याची माहिती दिली आहे.
गौतम अदानींची श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मोठी घसरणहिंडेनबर्ग संस्थेने अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड घट झाली. पहिल्या पाचात असलेले गौतम अदानी श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टॉप-30च्याही बाहेर फेकले गेले होते. मात्र, आता अदानी समूह हळूहळू यातून सावरत असून, गौतम अदानी पुन्हा एकदा यादीत एक एक पायरी वर चढताना दिसत आहेत. दरम्यान, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून एक समिती गठित करण्यात आली आहे. 6 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. शेअर बाजारातील घसरणीचे कारण आणि गुंतवणुकदारांचे नुकसान याची चौकशी ही समिती करणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीने दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.