बेळगाव : मार्चची पाणीपट्टी Advance भरण्याची सक्ती;
L & T कंपनीचा हा निर्णय

belgavkar.com | belgaum | belgavkar

पाणीपट्टी भरण्याची सक्ती एल & टी कंपनीने मागे घेतली;


बेळगाव : मार्चची पाणीपट्टी 31 मार्चपूर्वी भरण्याची सक्ती एल & टी कंपनीने मागे घेतली आहे. ही पाणीपट्टी 30 एप्रिलपर्यंत भरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याबाबतचे ट्विट कंपनीकडून करण्यात आले आहे. मार्चची पाणीपट्टी आगाऊ (Advance) भरण्याची सक्ती कंपनीने केली होती. त्यानंतर बेळगावातील अनेक नळधारकांनी ट्विटच्या माध्यमातून या आगाऊ पाणीपट्टी वसुलीला विरोध केला होता. त्याची दखल कंपनीला घ्यावी लागली आहे. आता 30 एप्रिलपर्यंत पाणीपट्टी भरु शकतात, असे कंपनीने ट्टिटमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे, नळधारकांना दिलासा मिळाला आहे.
बेळगाव शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी 1 जुलै 2021 पासून एल & टी कंपनीकडे आहे. तेव्हापासून कंपनीकडूनच पाणीपुरवठा व पाणीपट्टी वसुली केली जात आहे. कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाचे यावर नियंत्रण आहे. जानेवारीपासून विविध कारणांमुळे शहर पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. वारंवार पाणीटंचाई उद्भवत आहे. शहरातील 10 प्रभागांमध्ये 24 तास पाणी योजना आहे. त्या प्रभागांमध्येही दहा दिवस पाणीपुरवठा झाला नव्हता. त्यामुळे, शहरात टँकरला मागणी वाढली आहे. काही ठिकाणी पाणीटंचाईच्या विरोधात आंदोलनही केले जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत होत नसला तरी पाणीपट्टी मात्र नियमितपणे दिली जात आहे.
शहराला दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. पण, बापट गल्ली परिसरात 1 जानेवारी ते 15 मार्च या काळात केवळ पंधरा वेळाच पाणी सोडण्यात आले आहे. याउलट पाणीपट्टी पूर्ण आकारली जात आहे. शिवाय मार्चची पाणीपट्टी देताना ती 31 मार्चपूर्वी भरण्याची सक्ती केली जात आहे. या निर्णयाला विरोध झाल्यामुळे ही सक्ती मागे घेण्याची वेळ कंपनीवर आली आहे.