बेळगाव : गोवावेस येथील पेट्रोलपंपला टाळे ठोकले

belgavkar.com | belgaum | belgavkar

मनपाची 1 कोटींची भाड्याची रक्कम थकली

बेळगाव : गोवावेस येथील मनपाची खुली जागा पेट्रोलपंपकरिता भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. पण 3 वर्षे उलटली तरी भाडे जमा केले नसल्याने मनपाची 1 कोटींची भाड्याची रक्कम थकली आहे. त्यामुळे वारंवार नोटिसा बजावूनही भाडे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याने केल्याने महापालिकेच्या महसूल विभागाने पेट्रोलपंपला टाळे ठोकले आहे. गोवावेस येथील मनपाची जागा यापूर्वी पेट्रोलपंप चालविण्याकरिता भाडेतत्त्वावर दिली होती. पण लीज संपुष्टात आल्याने ती जागा ताब्यात घेऊन लिलावाद्वारे पुन्हा भाडेतत्त्वावर दिली होती.
पेट्रोलपंप चालविण्याकरिता देण्यात आलेल्या जागेचे भाडे प्रति महिना 2 लाख 20 हजारहून अधिक आहे. मात्र भाडेकरूंनी भाड्याची रक्कम भरली नाही. तीन वर्षांपासून भाडे थकले असल्याने महापालिकेच्या महसूल विभागाने वेळोवेळी सूचना करून भाडे भरण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. तरीदेखील भाड्याची रक्कम भरण्याकडे कानाडोळा केला होता. वर्षाला 25 लाखाहून अधिक भाडे मिळते. मात्र भाड्याची रक्कम थकल्याने पेट्रोलपंपला टाळे ठोकण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार महसूल विभागाने पेट्रोलपंपला टाळे ठोकण्याची कारवाई केली.