बेळगाव : हायटेक लर्निंग सेंटर... 20 ठिकाणांची निवड

belgavkar.com | belgaum | belgavkar

विद्यार्थी वसतिगृहांमध्ये तसेच निवासी शाळांमध्ये बहुउद्देशीय हायटेक लर्निंग सेंटर


बेळगाव : बेळगाव शहरातील समाजकल्याण व अल्पसंख्याक विभागाच्या विद्यार्थी वसतिगृहांमध्ये तसेच निवासी शाळांमध्ये बहुउद्देशीय हायटेक लर्निंग सेंटर सुरू करण्यात येणार आहे. स्मार्टसिटी विभागाकडून ही योजना राबविण्यात येईल. यासाठी वसतिगृहे व निवासी शाळा मिळून 20 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. आता या योजनेचा आराखडा तयार करण्याचे काम स्मार्टसिटी विभागाने हाती घेतले आहे.
दरम्यान, या योजनेसाठी आवश्यक साहित्य पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून स्मार्ट सिटी विभागाने निविदा मागविल्या आहेत. निविदेतील सर्वात कमी दरानुसार या योजनेसाठी किती निधी लागणार, हे निश्चित केले जाणार आहे. शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थी, निवासी शाळांमधील विद्यार्थी यांना राज्याचा शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविण्यासाठी या लर्निंग सेंटरचा वापर केला जाणार आहे. याशिवाय तेथे डिजिटल ग्रंथालय उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती तेथे असेल. माहिती, संवाद व तंत्रज्ञानाचा वापर करून वसतिगृहे व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे.
समाजकल्याण खात्याकडून शहरातील काही विद्यार्थी वसतिगृहे चालविली जातात. त्यात अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शहरातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची या वसतिगृहांत निवास व भोजनाची व्यवस्था केली जाते. याशिवाय मागासवर्गीय व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र वसतिगृहे चालविली जातात. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहांची देखभाल समाजकल्याण खात्याकडून केली जाते, पण सध्या त्या ठिकाणी केवळ निवास, अल्पोपहार व भोजन या सुविधाच उपलब्ध आहेत. शाळेतील अध्यापनाच्या आधारेच त्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी केली जाते. इतर मागास व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची वसतिगृहे बीसीएम विभागाकडून चालविली जातात. या वसतीगृहांची स्थितीही समाजकल्याण खात्याच्या वसतिगृहांप्रमाणेच आहे.