belgaum-बेळगाव-belgaum-subsidy-extended-by-taking-loans-in-favor-of-farmers-raibag-bastwad-बेळगाव-belgavkar-belgaum-20230244.jpg | बेळगाव : 3 शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन लाटली सबसीडी | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : 3 शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन लाटली सबसीडी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : 3 शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घेऊन लाटली सबसीडी

कृषी-बँक कर्मचाऱ्यांचा प्रताप

बेळगाव : शेतकरी कोणतेही कर्ज मागायला गेल्यानंतर बँकवाले विविध कारणे सांगतात. याचबरोबर अनेक कागदपत्रे जमा करा, असे सांगून कर्ज देण्याचे टाळतात. मात्र रायबाग तालुक्यातील बस्तवाड येथील 3 शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांची सबसीडी कृषी अधिकाऱ्यांसह बँक कर्मचारी आणि एजंटांनी लांबविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रयत संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. रायबाग तालुक्यातील बस्तवाड या गावातील शेतकरी बसवंत भीमा बजंत्री, सिद्धाप्पा कल्लाप्पा मांग, प्रकाश कल्लाप्पा मांग या तिघा शेतकऱ्यांच्या नावे 19 लाख रुपये प्रत्येकी कर्ज काढण्यात आले आहे.
त्यानंतर ते कर्ज काढून सबसीडी घेऊन बँक कर्मचारी, कृषी अधिकारी आणि एजंट हे नामानिराळेच राहिले आहेत. याबाबत चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. शेतीमध्ये भाजी पिकविण्यासाठी भव्य असे शेड तसेच कूपनलिका खोदाई करण्यासाठी 19 लाख 50 हजार रुपये कर्ज देतो, असे रायबाग येथील बनशंकरी अँग्रोईन या फर्मने सांगितले. त्यानंतर या तिन्ही शेतकऱ्यांचे उतारे जमा करून घेतले. शेतकऱ्यांना शेतामध्ये उभे करून छायाचित्रेही घेण्यात आली. त्यानंतर एका नामांकित बँकेतून या सर्वांना कर्ज देण्यात आले. या योजनेसाठी 90 टक्के सबसीडी होती. त्यामुळे ती सबसीडी या सर्वांनी मिळून लाटली आहे. शेतकऱ्यांना मात्र केवळ 80 ते 90 हजार रुपये देण्यात आले. तसेच कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. या प्रकारामुळे धक्का बसला असून कृषी विभागातील त्या अधिकाऱ्यांची, तसेच बँक अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी रयत संघटनेचे शिवानंद मुगळीहाळ, राघवेंद्र नाईक, हणमंत बजंत्री, श्रीकांत बजंत्री, रवी मांग, अक्कव्वा बजंत्री, आश्विनी मांग, चंद्रू मांग यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.