uddhav-thackeray-karnataka-maharashtra-border-crisis-morarji-desai-balasaheb-thackeray-belgaum-20221214.jpg | सीमावाद, उपपंतप्रधानच्या गाडीवर हल्ला अन् बाळासाहेबांना अटक; नेमकं काय घडलं होतं? | belgaum news | belgavkar बेळगावकर

सीमावाद, उपपंतप्रधानच्या गाडीवर हल्ला अन् बाळासाहेबांना अटक;
नेमकं काय घडलं होतं?

belgavkar.com | belgaum | belgavkar

शिवसेना आणि सीमाप्रश्न हा जोडलेला विषय आहे

1969 मध्ये सीमावादावरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगात बाळासाहेब ठाकरे यांना अटक

बेळगावसहीत कर्नाटकमध्ये असलेल्या मराठी भाषिक भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करा

महाराष्ट्र-नागपूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून आज विधानपरिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले. बेळगावसहीत कर्नाटकमध्ये असलेल्या मराठी भाषिक भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणीसुद्धा त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र सरकार याप्रकरणी शांत भूमिका का घेतंय असा सवाल त्यांनी विधानपरिषदेत बोलताना केला. तर सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलना वेळचा एक किस्सा त्यांनी सभागृहात सांगितला.

साल होतं 1969. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून आंदोलन पेटलं होतं. त्यावेळी मी (उद्धव ठाकरे) माझ्या आईसह उपस्थित होतो. तेव्हाचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत येणार होते. माहिमच्या नाक्यावर त्यांची गाडी थांबवली जाण्याची शक्यता होती. सीमावासीयांकडून त्यांना एक निवेदन दिले जाणार होते. त्यानंतर ते तिथून निघून जाणार होते. पण प्रत्यक्षात मात्र वेगळंच घडलं.
uddhav-thackeray-karnataka-maharashtra-border-crisis-morarji-desai-balasaheb-thackeray-belgaum-20221214_1.jpg | सीमावाद, उपपंतप्रधानच्या गाडीवर हल्ला अन् बाळासाहेबांना अटक; नेमकं काय घडलं होतं? | belgaum news | belgavkar बेळगावकर
मोरारजी देसाई आले आणि बेगुमानपणाने त्यांची गाडी निघून गेली. त्यांच्या ताफ्यातील पायलट कारने तेथे उपस्थित असलेल्या लोकांना उडवलं आणि त्या निघून गेल्या. त्यामध्ये अनेकजण जखमी झाले. काहीजणांच्या अंगावर गाडीचे चाकं गेली आणि अचानक दगडफेक सुरू झाली, अश्रुधूरांचा मारा सुरू झाला आणि त्याच रात्री शिवसेनाप्रमुखांना अटक झाली. सलग तीन महिने शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचे आणखी नेते पुण्यातील येरवडा तुरूंगात होते. अनेक शिवसैनिकांची धरपकड झाली. अनेक महिने मुंबई जळत होती. अनेक प्रयत्न केले गेले, मुंबईत आर्मी आणण्याचे प्रयत्न केले पण तुरुंगातून शिवसेनाप्रमुखांनी आवाहन केल्यानंतर एका क्षणात मुंबई शांत झाली.
शिवसेना आणि सीमाप्रश्न हा जोडलेला विषय आहे. या विषयाला आता 50 वर्षे होऊन गेली. कर्नाटकबद्दल शिवसेनेला आदरच आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी मुद्दाम जनरल करिआप्पा यांना उमेदवारी दिली होती. ते सैन्यामध्ये होते. त्यांचा मुलगासुद्धा सैन्यामध्ये होता. तेव्हा त्यांचा मुलगा पाकिस्तानचा युद्धकैदी होता. आम्ही एकदा तुमचा मुलगा सोडवून आणतो असं सांगितलं होतं पण त्यांनी त्यावेळी नकार दिला आणि म्हणाले की, 'तो माझा मुलगा आहे म्हणून फक्त त्याला सोडून आणायचं नाही. तर इतर सैनिक ज्यावेळी सुटतील त्यावेळी त्याला सोडवायचं' असं ते म्हणाले होते. अशी लोकं कर्नाटकात होते त्यांचा आम्ही आदर करतो पण सध्याच्या लोकांमध्ये अशी वृत्ती आली कशी? असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधानपरिषदेत बोलताना म्हणाले.