बेळगाव : तलाठी आता ग्राम प्रशासकीय अधिकारी

belgavkar.com | belgaum | belgavkar

केवळ तलाठी हे नाव इतकेच बदलले जात आहे

बेळगाव : शासकीय व्यवस्थेतील शेवटचे जबाबदार कर्मचारी म्हणून ओळख असणाऱ्या ‘तलाठी’ (Village Accountant) पदाला आता अधिकारी म्हणून जोड मिळणार आहे. तलाठ्यांना ‘ग्राम प्रशासकीय अधिकारी’ (व्हिलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर-व्हीएओ) म्हणून ओळखले जाणार आहे. याबाबतचा सुधारित आदेश लवकरच बजावला जाणार आहे. राज्याचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी सुरू केलेल्या ग्राम वास्तव्य कार्यक्रमात तलाठी हेच सर्वांत शेवटचे आणि महत्त्वाचे कर्मचारी असल्याचे त्यांना दिसून आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
तलाठ्यांना अधिकारी म्हणून दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे. पूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी सचिव आणि गावातील महसूलशी संबंधित कामे पाहण्यासाठी तलाठी ही दोन पदे महत्त्वाची होती. 2008 ला शासनाने ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी पंचायत विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली‌. तर प्रथम वर्षाने द्वितीय दर्जा असे दोन सचिवपद निर्माण केले. महसूल खात्यातून तलाठ्यांना अधिकारी पदाचा दर्जा मिळावा ही मागणी वर आली होती. या मागणीला मूर्त स्वरूप देण्याचे मंत्री अशोक यांनी ठरविले आहे. तलाठ्यांची नियुक्ती ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होते. किमान बारावी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांची मेरीट आधारावर यासाठी नियुक्ती केली जाते. राज्यात चार महसूल विभाग असून या चारही महसूल विभागाच्या प्रादेशिक आयुक्तांनी तलाठ्यांना अधिकारी म्हणून संबोधण्यासाठी यापूर्वीच संमती दिली आहे. त्यामुळे लवकरच अधिकारी म्हणून संबोधले जाणार आहे.‌
अधिकारी म्हणून जरी तलाठ्यांची श्रेणी बदलत असली तरी, त्यांच्या नियुक्तीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडेच असणार आहे. कोणत्याही प्रकारची वेतनश्रेणी आणि कर्तव्याची जबाबदारी ही बदल केली जाणारी नाही. केवळ तलाठी हे नाव इतकेच बदलले जात आहे.