belgaum-बेळगाव-belgaum-aundatti-renuka-devis-yatra-in-excitement-yallamma-temple-belgavkar-belgaum-20221228.jpeg | बेळगाव : सौंदत्ती डोंगरावर रेणुका देवीची यात्रा उत्साहात | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : सौंदत्ती डोंगरावर रेणुका देवीची यात्रा उत्साहात

belgavkar.com | belgaum | belgavkar

सौंदत्ती डोंगरावर यात्रेनिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त

वर्षातील सर्वात मोठी यात्रा असणाऱ्या शाकंभरी यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी

बेळगाव : दोन वर्षाच्या खंडानंतर कर्नाटकसह महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशमधील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सौंदत्ती डोंगरावरील श्री रेणुका देवीची यात्रा ‘उदो ग आई उदो’ च्या गजरात, ढोल ताशांच्या निनादात, भंडार्‍याची उधळण करीत उत्साहात सुरु असून 2 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. यल्लमाच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जोगणभावी येथे स्नानासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती.
बेळगाव, धारवाड, विजापूर, बागलकोट, कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी पहिल्यादांच डोंगरावरील सर्व मंदिराच्या आजुबाजुचे अतिक्रमण दूर केल्याने भक्तांना दर्शन करणे सुलभ झाले. वर्षातील सर्वात मोठी यात्रा असणाऱ्या शाकंभरी यात्रेनिमित्त सौंदत्ती डोंगरावर दाखल झालेल्या भक्तांना कन्नड संघटनांकडून त्रास होइल, अशी धास्ती कर्नाटक पोलिसांना होती. त्यामुळे पोलिसांनी डोंगरावर रेणुका भक्तांची काळजी घेतल्याचे चित्र बुधवारी सौंदत्ती डोंगरावर पाहावयास मिळाले; मात्र देवीचा जयजयकार करीत दिवसभरात दोन लाखांहून अधिक भक्तांनी देवीचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर प्रशासनातर्फे दिली आहे. यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होतात; मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून कन्नड संघटनांनी घातलेल्या धुडगुसामुळे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे दर्शनासाठी आतुरलेले भाविक दोन्ही राज्यांदरम्यान निर्माण झालेला तणाव भाविकांच्या दर्शनातील अडथळा ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत होते.
कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांत शाकंबरी पौर्णिमेला देवीच्या दर्शनाची संधी महाराष्ट्रातील भाविकांना मिळालेली नव्हती. यंदा कोणत्याही प्रकारचे संकट नसल्याने भाविकांनी डोंगरावर येण्यास सुरुवात केली होती, मात्र कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर काही प्रमाणात तणाव निर्माण झाल्यामुळे यात्रेवर परिणाम होईल का, अशी भीती व्यक्त केली जात होती. पोलिसांनी सकाळपासूनच महाराष्ट्रातील येणाऱ्या वाहनांना एकाच ठिकाणी आपली वाहने पार्क करण्याची सूचना केली होती. त्या परिसरात मोठा बंदोबस्त आहे. सौंदत्तीला गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांना कर्नाटक पोलीसांचं सुरक्षा कवच आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सौंदत्ती डोंगरावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.