gujarat-election-result-2022-bjp-has-been-in-power-in-gujarat-since-1995-but-such-recordbreak-victory-and-a-miracle-in-vidhansabha-eleciton-leadership-of-narendra-modi-20221227.jpg | Gujarat Election Result 2022 : गुजरातमध्ये 1995 पासून भाजपाचीच सत्ता, पण 'असा' चमत्कार कधीच झाला नव्हता | belgaum news | belgavkar बेळगावकर

Gujarat Election Result 2022 : गुजरातमध्ये 1995 पासून भाजपाचीच सत्ता, पण 'असा' चमत्कार कधीच झाला नव्हता

belgavkar.com | belgaum | belgavkar

मोदींच्या नेतृत्वात भाजपने 10 वर्षे गुजरातची सत्ता राखली. तर

भाजप यंदा गेल्या 27 वर्षातील रेकॉर्ड मोडत नवा रेकॉर्ड बनवू शकते

देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात निवडणुकीत यंदा भाजप रेकॉर्डब्रेक विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. सुरुवातीला आलेल्या मतमोजणीतील आकडेवारीनुसार गुजरातमध्ये भाजप तब्बल 153 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस उमेदवार केवळ 20 जागांवर आघाडी घेत आहेत. विशेष म्हणजे आम आदमी पक्षानेही यंदाच्या निवडणुकीत एंट्री करत 6 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे, काँग्रेसला मोठा धक्का असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये भाजप यंदा गेल्या 27 वर्षातील रेकॉर्ड मोडत नवा रेकॉर्ड बनवू शकते. 
राज्यातील 182 मतदार संघांतील मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली असून भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. गुजरातमध्ये भाजपच सत्तेत येणार हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे, यंदा विधानसभा निवडणुकीत भाजप इतिहास रचणार आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास भाजपला यंदा मिळत असलेलं यश हे सर्वात मोठं असल्याचं दिसून येतं. मोदींच्या नेतृत्वात भाजपने 10 वर्षे गुजरातची सत्ता राखली. तर, गेल्या 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचे कमळच सत्तेवर आहे. त्यानुसार, आत्तापर्यंतच्या विजयानुसार 2002 मध्ये गुजरातमध्ये भाजपला सर्वाधिक 127 जागांवर विजय मिळाला होता. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा विजय होता. मात्र, यंदा 150 जागांवर भाजपला विजय मिळण्याचा अंदाज आहे, त्यामुळे यंदा मोदी-शहांच्या नेतृत्त्वात भाजपने राजकीय चमत्कारच घडवला, असे म्हणता येईल. 
गेल्या 27 वर्षांतील निवडणूक निकाल
भाजपने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत 1995 पासून सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. मात्र, सन 2017 च्या गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला 100 जागांवर विजय मिळवणं कठीण बनलं होतं. 1995 मध्ये गुजरातची विधानसभा जिंकत भाजपने बहुमताने सत्ता काबिज केली. त्यावेळी, बीजेपीला 121 जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसला केवळ 45 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. इतर पक्षांना एकूण 16 जागा मिळाल्या होत्या.  त्यानंतर, 1998 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 117 जागांवर विजय मिळवत सत्ता राखली. तर, काँग्रेसला 53 जागांवर विजय मिळवता आला. पुन्हा मध्यावधी निवडणुका लागल्यामुळे 2002 साली भाजपने 127 जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवले होते. यावेळीही काँग्रेसला केवळ 51 जांगावरच विजय मिळवता आला. 
2007 मध्ये भाजपने 117 जागा जिंकत पुन्हा एकदा कमळ खुलवले. त्यावेळीही काँग्रेसला 59 जागांवरच समाधान मानावे लागले. म्हणजे 1995 पासून काँग्रेसला 50 ते 60 हाच आकडा गाठता आला आहे. त्यानंतर, 2012 मध्ये भाजपने मोदींच्या नेतृत्त्वात गुजरातमध्ये 115 जागांवर विजय मिळवला. तर, काँग्रेसने 61 जागा जिंकल्या. यावेळी इतर पक्षांना 6 जागा जिंकता आल्या. 
2017 मध्ये गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला शतक ठोकण्यापासून थांबवण्यात विरोधी पक्ष यशस्वी ठरले. भाजपने 99 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, काँग्रेसने चांगली आगेकूच केल्याचं पाहायला मिळालं. कांग्रेसने गत पंचवार्षिक निवडणुकीत 79 जागा जिंकल्या भाजपला टक्कर दिली. त्यामुळेच, यंदाच्या निवडणुकांची उत्सुकता काँग्रेसला अधिक होती.