belgaum-बेळगाव-belgaum-the-verdict-was-given-on-the-date-the-case-was-filed-mes-belgaum-protest-belgavkar-belgaum-20221212.jpg | बेळगाव : गुन्हा दाखल केलेल्या तारखेलाच लागला निकाल | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : गुन्हा दाखल केलेल्या तारखेलाच लागला निकाल

belgavkar.com | belgaum | belgavkar

समितीचे सर्व कार्यकर्ते निर्दोष

बेळगाव : धर्मवीर संभाजी चौक येथे लोकशाही मार्गाने लाल-पिवळा ध्वज हटवावा यासाठी आंदोलन केल्यानंतर म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी सुरू होती. त्याचा निकाल 5 वर्षांनंतर खटला दाखल केलेल्या तारखेलाच लागला. हे सर्व कार्यकर्ते न्यायालयाने निर्दोष असल्याचा निकाल दिला. यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. म. ए. समितीचे कार्यकर्ते मनोज पावशे, सूरज कणबरकर, नारायण किटवाडकर, अजित कोकणे, सुधीर कालकुंद्रीकर, सतीश गावडोजी आणि मयत द्वारकानाथ उरणकर हे सर्वजण निर्दोष झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी 7 डिसेंबर 2017 रोजी धर्मवीर संभाजी चौक येथे लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते.
प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या लाल-पिवळ्या रंगाच्या ध्वजामुळे तिरंग्याचा अवमान होत आहे, असा आरोप करत या कार्यकर्त्यांनी तो हटविण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र पोलिसांनी भाषिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या सर्वांनी केल्याचा आरोप केला. त्यांच्यावर कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सर्वांवर दोषारोप दाखल केले होते. जेएमएफसी पाचवे आणि कनिष्ट दिवाणी न्यायालयामध्ये या खटल्यात 8 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. साक्षी नोंदविताना केवळ पोलिसांचीच साक्ष नोंदविण्यात आली. एकाही इतर व्यक्तीची साक्ष नोंदविली गेली नाही. पोलिसांनी सांगितलेल्या साक्षीमध्ये तफावत आढळली. त्यामुळे न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांच्यावतीने अ‍ॅड. महेश बिर्जे, अ‍ॅड. बाळासाहेब कागणकर, अ‍ॅड. रिचमॅन रिकी यांनी काम पाहिले.