maharashtra-karnataka-borderism-sharad-pawar-protested-in-belgaum-under-the-leadership-of-sm-joshi-20221244.jpg | बेळगाव पोलिसांचा मार खाल्ला... पण बंदी असताना शरद पवार कर्नाटकात घुसलेच; वेषांतराचा तो किस्सा वाचा | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव पोलिसांचा मार खाल्ला... पण बंदी असताना शरद पवार कर्नाटकात घुसलेच; वेषांतराचा तो किस्सा वाचा

belgavkar.com | belgaum | belgavkar

महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरलेलं

बेळगावात जमावबंदी होती. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून चौकात जायचं, असं ठरलेलं

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न आज पुन्हा चर्चेत आलेला असला तरी मागच्या 60-65 वर्षांपासून हा मुद्दा खितपत पडलेला आहे. जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढा सुरु होता तेव्हा दोन राज्यांमध्ये तणावाचं वातावरण होतं. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकामध्ये जाण्यास बंदी होती. तरीही शरद पवारांनी युक्ती करुन आंदोलनस्थळ गाठलं होतं. 'बेळगाव, बिदर, कागवाड, धारवाडसहीत संयुक्त महाराष्ट्र' अशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची मागणी होती. या लढ्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, एन. डी. पाटील यांच्यापासून बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनीही सहभाग घेतलेला होता. साधारण 1980 मध्ये बेळगाव प्रश्नावर महाराष्ट्रात एस. एम. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं करण्यात येत होती.
पहिल्या दिवशीचं नेतृत्व शरद पवारांकडे
शरद पवारांच्या बाबतीत एक किस्सा नेहमी सांगितला जातो. सीमाभागत राहणाऱ्या लोकांना कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली होती. शिवाय कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात एक आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला. 1986 मध्ये एस. एम. जोशी यांनी तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जावून भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरलेलं. परंतु कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली. पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व शरद पवारांकडे होतं. पण बेळगावला जायचं कसं, हा प्रश्न होता. जागोजागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मुंगीलासुद्धा परवानगीशिवाय आत जायची सोय नसावी, इतका कडक बंदोबस्त.
वेषांतर करुन शरद पवार बेळगावात
बेळगावात दाखल होण्यासाठी शरद पवारांनी एक युक्ती केली. सुरुवातीला ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक चालक होता. पवारांनी स्वतः चालकाचा वेष परिधान केला. चालकाला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही. शरद पवार बेळगावात पोहोचले होते. कुणाला थांगपत्ता लागला नव्हता. बेळगावात जमावबंदी होती. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून चौकात जायचं, असं ठरलेलं. शरद पवार पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्का केला होता.
पाठीवर वळ उठेपर्यंत पवारांना मारहाण
आंदोलनाची वेळ झाली. बरोबर 11 वाजता राणी चन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शरद पवार, बाबासाहेब कुपेकर, एन. डी. पाटील यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. शरद पवारांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर नेलं. तिथंही लोकं जमा होऊ लागली. एस. एम. जोशींचं वय वाढललं होतं. तरीही ते पवारांना भेटायला गेले. त्यांनी त्यावेळी पवारांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. शरद पवारांनीच हा किस्सा नंतर सांगितला. आज बेळगाव देण्याचं सोडाच. उलट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या काही गावांवर दावा केलाय. त्यामुळे राज्यात रोष व्यक्त होतोय. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या मंत्र्यांचा कर्नाटक दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.