belgaum-बेळगाव-belgaum-maharashtra-karnataka-border-issue-belgaum-tour-of-all-three-is-confirmed-belgavkar-belgaum-20221250.jpg | बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न | तिघांचाही बेळगाव दौरा निश्चित | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न | तिघांचाही बेळगाव दौरा निश्चित

belgavkar.com | belgaum | belgavkar

समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई व तज्ज्ञ कमिटीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांचा बेळगाव दौरा निश्चित

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई व तज्ज्ञ कमिटीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांचा बेळगाव दौरा निश्चित झाल्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते स्वागताच्या तयारीला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून समन्वयक मंत्री बेळगावला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कन्नड संघटनाकडून विविध प्रकारची कोल्हेकुई सुरू केली असली तरी दोन्ही मंत्र्यांनी बेळगावला येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार मंत्री पाटील, देसाई व खासदार धैर्यशील माने हे मंगळवारी सकाळी बेळगावला दाखल होणार आहेत.
त्यानंतर हुतात्मा स्मारकाला भेट देण्यासह मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी मंत्री पाटील, देसाई व खासदार माने हे संवाद साधतील. हुतात्मा स्मारक येथे स्वच्छतेचे कामदेखील पूर्ण केले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर समन्वयक मंत्र्यांची लवकर नेमणूक करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई येथे सीमाप्रश्नी उच्चाधिकार कमिटीची बैठक घेतली होती. यावेळी महाराष्ट्राचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची सीमाप्रश्नासाठी समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक केली होती.
समन्वयक मंत्र्यांची नेमणूक झाल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी बेळगाव येथे येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी आणि येथील मराठी भाषिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी मागणी होऊ लागली होती. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील दोन्ही मंत्र्यांना पत्र पाठवून बेळगावला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आता दोन्ही मंत्री सुरुवातीला शनिवारी बेळगावला येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. मात्र, शहरातील काही आंबेडकरवादी संघटनांनी महापरिनिर्वाण दिनाला उपस्थित राहण्याची विनंती चंद्रकांत पाटील यांना केली होती. त्यामुळे 3 तारखेचा दौरा पुढे ढकलला. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाला चालना देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी समितीकडून सातत्याने केली जात आहे. त्याबाबत दोन्ही मंत्री समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून पुढे काय करता येईल, याबाबत निर्णय घेणार आहेत. तसेच सीमाप्रश्नी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ कमिटीच्या अध्यक्षपदी खासदार माने यांची निवड केली आहे. यापूर्वी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तज्ज्ञ कमिटीची धुरा होती. कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मानेदेखील पहिल्यांदाच बेळगावला येत आहे. त्यामुळे तिघांच्या दौऱ्याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे.