solapur-akkalkot-karnataka-chief-minister-controversial-statement-again-criticizes-devendra-fadnavis-20221135.jpeg | कर्नाटकचा डोळा महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोटवर | belgaum news | belgavkar बेळगावकर

कर्नाटकचा डोळा महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोटवर

belgavkar.com | belgaum | belgavkar

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही टीका

बेळगाव, कारवार, निपाणी यांसह अन्य मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी खंबीर लढा देईल

हे हास्यास्पद असून तेथील भाजप सरकारचा हा आगाऊपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही
सांगलीच्या जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केल्याचा दावा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी ‘महाराष्ट्रातील कन्नड भाषिक सोलापूर आणि अक्कलकोट हे भाग कर्नाटकात यायला हवेत,’ असे वादग्रस्त विधान केले. तसेच मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात आणण्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांनी पाणीप्रश्नावरून कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव केला आहे, असा दावा बोम्मई यांनी केला होता. मात्र, जत तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी तो खोटा असल्याचे स्पष्ट केले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर देत ‘महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. उलट कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी यांसह अन्य मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात खंबीर लढा देईल,’ असे म्हटले होते. त्यावर बोम्मई यांनी गुरुवारी पुन्हा नवीन वादग्रस्त विधान केले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान प्रक्षोभक असून त्यांचे स्वप्न कधीच सत्यात उतरणार नाही, असे बोम्मई म्हणाले. कर्नाटकच्या सीमाभागातील छोटीशी जागाही सोडणार नाही, असे सांगतानाच महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग आमच्याकडे यावेत, अशी मागणी असल्याचे ते म्हणाले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अंगात भूत संचारल्याने त्यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा केला आहे. बोम्मई हे वरिष्ठांना विचारून भाजपची भूमिका बोलत आहेत का, असा सवाल करीत केंद्र सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेबरोबर खेळत आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला. बोम्मईंबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले, तर ते सांगतील पंतप्रधानांना विचारून सांगतो. दिल्लीच्या आशीर्वादामुळेच ते या पदावर आहेत. कर्नाटकने महाराष्ट्रातील 40 गावे घेतली तर काय झाले, आपण पाकव्याप्त काश्मीर घेऊ, असे उत्तर मुख्यमंत्री देतील, अशी खिल्ली ठाकरे यांनी उडविली. राज्यात मिंधे सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राची अवहेलना होत आहे. मुख्यमंत्री गंभीर नाहीत. उद्योग गुजरातला जात आहेत. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे? असा सवाल ठाकरे यांनी केला.
बेळगाव, कारवार आणि निपाणीसह अन्य गावांवरही महाराष्ट्राचा दावा असून आम्ही आमची भूमिका सर्वोच्च न्यायालयापुढील दाव्यात मांडलेली आहे. त्याबाबत पुरावेही सादर केले आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बोम्मई किंवा अन्य कोणीही सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. कोणी कितीही दावे केले, तरी आमचे एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही, उलट आमची गावे परत मिळतील. न्यायालयात व संविधानाच्या चौकटीत जी मागणी केली आहे, त्याला कोणी चिथावणीखोर म्हणू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले. राज्यनिर्मिती झाल्यापासून कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत वाद सुरू आहे. कर्नाटकमध्ये व केंद्रात काँग्रेस व मित्रपक्षांचे सरकार भाजपपेक्षा अधिक काळ होते. पण तेव्हाही सीमाप्रश्न सुटला नाही. महाराष्ट्रातील आधीच्या सरकारांनी घेतलेली भूमिकाच आम्ही कायम ठेवली आहे. पक्षांमधील वाद कधीही सीमावादात आणला गेला नाही, आपण एकजूट दाखविली. त्यामुळे आताही कोणीही यात राजकीय वाद आणू नये, नाहीतर सीमाप्रश्न खिळखिळा होईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
सोलापूर, अक्कलकोट, जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकने हक्क सांगावा हे हास्यास्पद असून तेथील भाजप सरकारचा हा आगाऊपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. शिंदे-फडणवीस सरकार आता आपल्या राज्यातील गावेही भाजपशासित राज्यांच्या घशात घालणार आहात का, असा प्रश्न त्यांनी केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे हे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही. त्यांनी हे स्वप्न पाहूही नये, अशा शब्दात अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बोम्मई यांना आक्रमक पद्धतीने उत्तर दिले आहे. सोलापूर आणि अक्कलकोटची बहुतांश जनता कन्नड भाषक असली तरीही त्यांच्यापैकी एकानेही कर्नाटकात समाविष्ट होण्याची मागणी केली नाही. आम्ही सारेजण कन्नड भाषक असलो तरी महाराष्ट्र आमचा श्वास आहे. आमची संस्कृती महाराष्ट्रच आहे, असे  कल्याणशेट्टी यांनी नमूद केले आहे.