nagraj-upcomming-movie-on-wrestler-khashaba-jadhav-1952-olympic-wrestlers-on-the-big-screen-20221123.jpeg | नागराज मंजुळेंच्या आखाड्यात 'कुस्ती', मोठ्या पडद्यावर झळकणार देशाचा पहिला ऑलिम्पिकवीर | belgaum news | belgavkar बेळगावकर

नागराज मंजुळेंच्या आखाड्यात 'कुस्ती', मोठ्या पडद्यावर झळकणार देशाचा पहिला ऑलिम्पिकवीर

belgavkar.com | belgaum | belgavkar

देशासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा लाल मातीतला मराठी माणूस

म्हणणारा लाल मातीतला पैलवान म्हणजे ऑलिंपिक पदकवीर खाशाबा जाधव

‘मी पुन्हा जन्माला आलो तर पहिलवानच होईन अन् असलंच अजून एखादं पदक माझ्या भारताला मिळवून देईन,’ असं म्हणणारा लाल मातीतला पैलवान म्हणजे ऑलिंपिक पदकवीर खाशाबा जाधव, देशासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय पदक मिळवणारा लाल मातीतला मराठी माणूस. कुस्तीच्या क्षेत्रात भारताचं नाव सर्वप्रथम जगात झळकवणारा महाराष्ट्रपुत्र. आमीर खानची भूमिका असलेल्या दंगल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवला. आमीरमुळे पै. महावीर फोगाट आणि गीता फोगाट जगाला माहिती झाली. दंगलमुळे फोगाट कुटुंबीय देशाच्या घराघरात पोहोचले. मात्र, ज्याचं कर्तृत्व गावच्या लाल मातीतच दबून राहिलं, त्या ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव (सातारा) यांची संघर्षकहानी आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 
आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला दंगल चित्रपट चाहत्यांच्या मनात घर करुन गेला. हरयाणातील गीता आणि बबिता फोगाट यांच्या कुस्तीचा सुवर्णप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर आला. तर, महावीर फोगाट यांची जीवनकथाही सर्वांना 70 मि.मि. पाहायला मिळाली. आता, याच पडद्यावर देशातील पहिल्या कास्यपदक विजेत्या खाशाबा जाधव यांचा जीवनप्रवास झळकणार आहे. हेलसिंकी 1952 चा तो काळ पुन्हा एकदा इतिहासाची आठवण करुन देणार आहे. नव्या पिढीला तो काळ पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. 
''लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक आणि करमाळा भूमिपुत्र श्री नागराज अण्णा मंजुळे यांच्या माध्यमातून पै. स्व खाशाबा जाधव यांची संघर्षमय जीवनगाथा असणारा चित्रपट  निघणार आहे. हा चित्रपट दंगलपेक्षा भव्य असणार ही खात्री आहेच'', अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली. तसेच, लाल मातीच्या प्रेमापोटीच देशाला पहिले ऑलम्पिक मेडल मिळवून देणारे पै स्व खाशाबा जाधव यांस मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी पै युवराज काकडे, पै संग्राम कांबळे यांच्या साथीने राज्य आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा करत आहे... लवकरच याला यश येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
खाशाबा जाधव हे भारतीय क्रीडा क्षेत्रात एक चालती बोलती दंतकथा आहेत. लाल मातीतला हा पैलवान लाल मातीतच दबून गेला. देश स्वतंत्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख तयार करण्याचा नवीन लढा देशात नुकताच सुरू झाला होता. गरिबी हे आव्हान होतं आणि हाताशी अगदी तुटपुंजी साधनं होती. त्यावेळी, क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा उंचावली अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि कुस्तीतले पैलवान खाशाबा जाधव. ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो. आता, याच पहिल्या ऑलिंम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट निघणार आहे, ही महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यातच, नागराज मंजुळेंच्या माध्यमातून हा चित्रपट निघणार म्हणजे अत्यानंदच. 
दरम्यान, खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी 'ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव' या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात मेडल जिंकलेल्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. 'ऑलिम्पिक स्पर्धा संपायला फक्त 2-3 दिवसच बाकी होते. बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान आटोपलेलं होतं. त्यामुळे संघाबरोबर असलेले व्यवस्थापक दिवाण प्रताप चंद यांना शहर बघण्याची घाई झाली होती. इतरांनाही युरोपातलं हे शहर मनसोक्त भटकायचं होतं.' दुधाणे आपल्यासमोर तो दिवस उभा करतात.
खाशाबांच्या नावाची स्पर्धाही गुंडाळली
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 1998 मध्ये ‘खाशाबा जाधव राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप’ सुरू केली. या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरचे मल्ल उतरत. या स्पर्धेतच नरसिंग यादवसारखे अनेक मल्ल चमकले. ऑलिम्पिकपर्यंत जाऊन धडकले; परंतु 2012 मध्ये काय चमत्कार घडला कुणास ठाऊक. राष्ट्रीय पातळीवरची ही स्पर्धा थेट राज्यस्तरीय करण्यात आली. त्यानंतरही दोन-तीन वर्षांत पूर्णपणेच गुंडाळली गेली. शेवटची स्पर्धा नाशिकमध्ये खेळविली गेली. याठिकाणी काहीतरी वाद झाला म्हणून त्यानंतर या स्पर्धेचं आयोजन थांबविलं गेलं. ही स्पर्धा पुन्हा सुरू करावी म्हणून खाशाबांचे सुपुत्र रणजित जाधवांनी पुण्याच्या क्रीडा आयुक्तांपासून ते मंत्रालयीन क्रीडा सचिवांपर्यंत प्रत्येकाशी संवाद साधला. क्रीडामंत्र्यांनाही वारंवार विनवण्या केल्या. जणू ऑलिम्पिकवीर खाशाबांचं नाव टिकविण्याची जबाबदारी फक्त त्यांच्या कुटुंबाचीच होती, बाकीच्यांना जणू काहीही देणं-घेणंच नव्हतं.