बेळगाव : आंबेडकरनगर येथे कॉलेज तरुणाची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कॉलेज तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास उघडकीस आली. गौतम ऊर्फ गिरी परशुराम नरगुंद (वय 17, रा. गणेश चौक, आंबेडकरनगर, बेळगाव) असे मृताचे नाव आहे. गौतम हा शहरातील एका नामांकीत कॉलेजमध्ये अकरावीत शिकत होता. मंगळवारी रात्री 8.15 वा. त्याचे आई-वडील बाजारसाठी बाहेर पडले. त्यांनी गौतमलादेखील सोबत बोलावले. परंतु, अभ्यास असल्याचे सांगत तो घरीच थांबला.
बाजार आटोपून 9.30 वा. जेव्हा पालक घरी परतले तेव्हा गौतमने राहत्या घरात गळफास घेतल्याचे दिसून आले. वडिलांनी शेजाऱ्यांना बोलावून घेत ही माहिती एपीएमसी पोलिसांना दिली. उपनिरीक्षक मंजुनाथ बडीगेर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांत नोंद झाली आहे.