in-shraddha-walker-murder-case-maharashtra-police-will-investigate-says-union-home-minister-amit-shah-20221125.jpg | श्रद्धा वाळकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं वक्तव्य | belgaum news | belgavkar बेळगावकर

श्रद्धा वाळकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं वक्तव्य

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्रद्धा वाळकर हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं काही दिवसांपूर्वी तपासातून समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. याच संदर्भात महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, श्रद्धा प्रकरणात दोषींची गय केली जाणार नाही, असंही अमित शाह यांनी सांगितलं आहे. दरम्यान, एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना अमित शाहांनी हे वक्तव्य केलं आहे. 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी बोलताना सांगितलं की, 'श्रद्धा वाळकर हत्याकांडातील आरोपींना कमीत कमी वेळेत कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. माझं संपूर्ण प्रकरणावर लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की, ज्या कोणीही हे कृत्य केलं असेल, त्याला कमीत कमी वेळेत कायदा आणि न्यायालयाद्वारे कठोरात कठोर शिक्षा सुनावली जाईल.' 
श्रद्धा वाळकर प्रकरणाचा तपास दिल्ली आणि मुंबई पोलिसांकडून सुरु आहे. दिल्ली आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव नसल्याचंही अमित शहांनी स्पष्ट केलं. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, 'जे पत्र समोर आलं आहे. त्यात दिल्ली पोलिसांची कोणतीही भूमिका नव्हती. श्रद्धानं महाराष्ट्रातील एका पोलीस स्थानकात पत्र पाठवून तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन तिला जीवेमारण्याची धमकी आफताबकडून दिली जात असल्याचं सांगितलं होतं. पण त्यावेळी कोणतीही कारवाई झालेली नाही. याच गोष्टीची चौकशी केली जाईल. त्यावेळी आमचं सरकार नव्हतं, त्यामुळे त्यावेळी जे कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.' 
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये कॉल सेंटरची कर्मचारी श्रद्धा वाळकर हिने लिहिलेल्या पत्रावर कारवाई करण्यात महाराष्ट्र पोलिसांच्या कथित अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला यानं आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं श्रद्धा वाळकरनं पत्रात लिहिलं होतं. आफताबनं लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वाळकरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याचा आरोप आहे. आफताबनं श्रद्धाच्या शरीराचे हे तुकडे दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्यांच्या घरी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवल्याचा आरोप आहे. मध्यरात्री शहरातील विविध भागांत श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकण्यासाठी तो अनेक दिवस फिरत होता. त्याला दिल्ली पोलिसांनी 19 नोव्हेंबरला अटक केली होती.