uddhav-thackeray-shivsena-slams-cm-eknath-shinde-and-bjp-over-karnataka-chief-minister-asking-for-villages-in-maharashtra-20221106.jpg | “तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीतून वेळ मिळाला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी…”; शिवसेनेनं शिंदेंसहीत भाजपालाही सुनावलं | belgaum news | belgavkar बेळगावकर

“तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीतून वेळ मिळाला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी…”; शिवसेनेनं शिंदेंसहीत भाजपालाही सुनावलं

belgavkar.com | belgaum | belgavkar

खोके सरकारात जीव नाही. मनगटात सळसळ नाही. लढण्याची धमक नाही

नेहरूंनी केलेली चूक तुमचे जोरदार पंतप्रधान मोदी का सुधारत नाहीत?

बेळगावात सुरू असलेल्या मराठी बांधवांवरील अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्रातील एकाही भाजपा पुढाऱ्याने धिक्कार तरी केला आहे काय?
बेळगावमधील मराठी सीमा बांधवांच्या छाताडावर पाय ठेवून कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील जत व सोलापुरातील अक्कलकोटवर दावा सांगितला आहे, असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. 40 गावांसंदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’मधून कठोर शब्दांमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपाला लक्ष्य करण्यात आलं आहे. “महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांची एका बाजूला बदनामी करत राहायचे त्याच वेळी महाराष्ट्राच्या सीमाभागाचे लचके तोडायचे, असे कारस्थान रचले जात आहे. ते आता उघड झाले आहे. राज्यपाल कोश्यारी व भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या. ते प्रकरण तापलेले असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांवर दावा सांगून महाराष्ट्राच्या मिंधे सरकारला आव्हान दिले आहे. हा असा मस्तवालपणा कर्नाटकच्या या आधीच्या कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी दाखवला नव्हता,” असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
“राज्यात कमजोर, अशक्त, बेकायदेशीर ‘खोके’ सरकार आल्यापासून इतर राज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले सुरू केले. बाजूचे गुजरात राज्य महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय पळवत आहे तर कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व मुद्द्यांवर गप्प असून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत,” असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या 70-75 वर्षांपासून भिजत घोंगड्याप्रमाणे पडला आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापासून महाजन कमिशनच्या अन्यायाविरोधात मराठी सीमाबांधवांनी असंख्य लढे दिले, बलिदाने दिली; पण सीमाभागातील मराठी बांधवांना न्याय मिळत नाही. उलट त्यांच्यावर जुलूम-अत्याचार वाढतच आहेत. सीमाभागाचे संपूर्ण कानडीकरण करून मराठी भाषा, संस्कृतीचे अस्तित्व नष्ट करण्याचे अघोरी प्रकार सुरू आहेत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे व ‘तारीख पे तारीख’च्या पेचात फसले आहे. त्यात आता कर्नाटकमधील भाजपाचे मुख्यमंत्री बोम्मई महाशयांनी महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट वगैरे गावे कर्नाटकात खेचण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्र अस्मितेचा हा असा घोर अपमान होऊनही ‘खोके’ गटाचा एकही स्वाभिमानी आमदार उसळून उठलेला दिसत नाही,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
“भाजपाचे आमदार व मंत्री यावर मऱ्हाठी बाण्याची खणखणीत भूमिका घेतील ही अपेक्षाच करू नये. अर्थात भाजपचे एक तोंडाळ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीप्रमाणे या प्रश्नाचे खापरही पंडित नेहरूंवर फोडले आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले की, ‘‘महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद ही खरे तर दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची देणगी आहे.’’ आता प्रश्न असा की, नेहरूंनी केलेली चूक तुमचे जोरदार पंतप्रधान मोदी का सुधारत नाहीत? मोदी हे रशिया आणि युक्रेन युद्धात मध्यस्थी करतात, तोडगा काढतात; पण बेळगावातील सीमाबांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर बोलत नाहीत. मराठी बांधवांवरील अन्याय रोखू नये यासाठी मोदी सरकारचे हात व तोंड नेहरूंनी बांधून ठेवले आहे काय? बेळगावात सुरू असलेल्या मराठी बांधवांवरील अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्रातील एकाही भाजपा पुढाऱ्याने धिक्कार तरी केला आहे काय? बेळगाव-कारवारसह सीमाभाग महाराष्ट्रात आलाच पाहिजे, अशी गर्जना भाजपाच्या मंडळींनी केल्याचे दिसत नाही. बेळगाव-कारवारसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात यावा असे महाराष्ट्र भाजपाला खरेच वाटत आहे काय? ही शंकाच आहे,” असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे.
“महाराष्ट्र-बेळगावसह सीमाभागातील तरुणांना महाराष्ट्रातील विद्यापीठात राखीव जागा ठेवण्याचा निर्णय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता. सीमाप्रश्नासाठी शिवसेनाप्रमुखांनी 100 दिवसांचा तुरुंगवास भोगला व शिवसेनेने बेळगावसाठी 69 हुतात्मे दिले. असा त्याग महाराष्ट्रातील एखाद्या राजकीय पक्षाने दिला असेल तर सांगावे. उलट बेळगावात मराठी एकजुटीचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा नेते तेथे जातात व मऱ्हाठी अस्मितेशी बेइमानी करून परत येतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणे कधीकाळी सीमाभागात जाऊन आंदोलन केले असे सांगतात, पण गेल्या अनेक वर्षांपासून या महाशयांकडे सीमाभागाचा कार्यभार होता. ते किती वेळा बेळगावला गेले? गेल्या चारेक महिन्यांपासून ते मुख्यमंत्री आहेत. काय केले त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी? मुख्यमंत्र्यांचे रोज चार तास तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीत जात आहेत, पण सीमाबांधवांचे भविष्य आणि भवितव्य तसेच अंधकारमय आहे. त्यांचे कानडी टाचांखाली चिरडणे व भरडणे संपलेले नाही. तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीतून वेळ मिळाला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा कठोर समाचार घेतला पाहिजे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
“ठाणे-कल्याणमधील शिवसेनेच्या शाखा, शिवसैनिकांची घरे बळाचा वापर करून ताब्यात घेणे ही मर्दानगी नसून कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांच्या मस्तवाल भाषेस सडेतोड उत्तर देणे व बेळगावात घुसून मराठीजनांच्या पाठीशी उभे राहणे हेच शिवरायांच्या महाराष्ट्राचे शौर्य आहे, पण आज महाराष्ट्रात या शौर्याचा व मर्दानगीचा दुष्काळ पडल्यानेच बेळगावमधील मराठी सीमाबांधवांच्या छाताडावर पाय ठेवून कानडी मुख्यमंत्र्यांनी आज सांगलीतील जत व सोलापुरातील अक्कलकोटवर दावा सांगितला आहे. महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या खोके सरकारात जीव नाही. मनगटात सळसळ नाही. लढण्याची धमक नाही. महाराष्ट्र कालपर्यंत पाणी दाखवत होता, आज महाराष्ट्राचे पाणी जोखले जात आहे. मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल! त्यातच सगळ्यांचे हित आहे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.