news.jpg | बल्बमध्ये साकारली विठुमाऊली, सिंधुदुर्गातील कलाशिक्षकाने केली किमया  | belgaum news | belgavkar बेळगावकर

बल्बमध्ये साकारली विठुमाऊली, सिंधुदुर्गातील कलाशिक्षकाने केली किमया 

belgavkar.com | belgaum | belgavkar

कलेच्या माध्यमातून विठुमाऊलीच्या चरणी आपली भक्तीसुमने अर्पित करत आहेत.

सिंधुदुर्ग : कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी आषाढी एकादशीचा उत्साह पंढरपुरात दिसत आहे. लाखो वारकरी विठुमाऊलीच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. दरम्यान, कला क्षेत्रातील कलाकार मंडळी ही आपल्या कलेच्या माध्यमातून विठुमाऊलीच्या चरणी आपली भक्तीसुमने अर्पित करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील वराडकर हायस्कूल, कट्टा येथील कलाशिक्षक समीर चांदरकर यांनीही आपल्या कलेच्या माध्यमातून विठुरायाचं आगळं वेगळं रूप साकारलं आहं. समीर चांदरकर यांनी लाईटच्या बल्बमध्ये विठुरायाचं रूप साकारलं आहे. चांदरकर यांनी बल्बमध्ये केवळ तीन सेंटीमीटर उंचीची मातीची नयनरम्य मूर्ती साकारली आहे.
गेली दोन वर्ष तुझ्या दर्शनाला मुकलेले भक्तगण आज नव्या जोशात वारीत बेभान होऊन नाचत आहेत. सोसाट्याचा वारा ,पाऊस या कशाचीही तमा न बाळगता पांडुरंग नामी तल्लीन झालेले आहेत. कोविड काळात वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नाही, परिस्थिती फार गंभीर होती .आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण होता. खरंतर या काळात आपल्या प्रिय भक्तांना भेटण्यासाठी पांडुरंग कोणत्या ना कोणत्या रूपात मदतीला धावून आला. कधी डॉक्टर ,कधी पोलीस, तर कधी सफाई कर्मचारी बनुन त्याने आपल्या अस्तित्वाचा साक्षात्कार दिला. पांडुरंगाचा हाच साक्षात्कार या कलाकृतीच्या माध्यमातून साकार करण्याचा केलेला छोटासा प्रयत्न.
एका छोट्याशा बल्ब मध्ये माती पासून तयार केलेली तीन सेंटीमीटर उंचीची ही मूर्ती ब्लब मध्ये उतरवताना अनेक वेळा अपयश आले. परंतु मनाशी केलेल्या निर्धाराला पांडुरंगाने साथ दिली आणि ही कलाकृती पूर्ण झाली. माझ्या कलाकृतीच्या माध्यमातून सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.