फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला धर्मवीर संभाजी महाराजांना पकडण्यात आले. त्यांचा छळ करून एक एक अवयव काढण्यात आले. परंतु त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत धर्म सोडला नाही. ही घटना क्लेषदायक असल्याने आजही युवापिढी धर्मवीर बलिदान मासचे आचरण करते. कोणतीही एखादी सवय, अन्नपदार्थाचा त्याग करून बलिदान मासचे आचरण केले जाते. शेवटच्या दिवशी शहरात मूकफेरी काढून शोक व्यक्त करण्यात येतो. बेळगाव शहर, तालुका, खानापूर, गोकाक, बैलहोंगल, चिकोडी, निपाणी, संकेश्वर या परिसरात बलिदान मास पाळला जातो. यानिमित्त दररोज महाराजांच्या प्रतिमेसमोर पूजन व श्लोक म्हटले जातात. मागील काही वर्षांमध्ये बलिदान मास पाळण्यामध्ये पुरुषांसह महिलांचीही संख्या वाढली आहे. महाविद्यालयीन तरुणीही बलिदान मासचे आचरण करीत आहेत.