trafficking-tortoise-sale-one-person-arrested-belgaum-20200114.jpg | कासवाची तस्करी करणाऱ्यांना अटक | belgaum news | belgavkar बेळगावकर

कासवाची तस्करी करणाऱ्यांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

कासवाची अवैध विक्री करणाऱ्या तस्कराला वनविभागाने अटक केली असून, त्याच्याकडून कासव जप्त करण्यात आले आहे. सोमवारी राञी ही कारवाई राकस्कोप रस्त्यावर वनखात्याने केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमृत शिवाजी बेनके (वय 45, ता. चंदगड, ढेकोळी गांव) आहे. कासवांची अवैध विक्री करीत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. माहितीच्या आधारे वन विभागाचे अधिकारी त्याच्यावर पाळत ठेवून होते. डी.सी.एफ. (DCF : Deputy Conservator of Forest) अमरनाथ यांच्या आदेशानुसार आर.एफ.ओ. (RFO : Range Forest Officer) आर. एच. डोंबरगी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पाच लाख रुपयाला कासवाची विक्री करण्यात येणार होती. आरोपीवर वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कासवांचे मांस खाल्ल्याने वाताचे आजार बरे होतात, घरात रोगराई व साठीचे आजार येत नाही अश्याप्रकारचे भ्रामक गैरसमज असल्याने काही विशिष्ट जमातीचे लोक मोठ्या प्रमाणावर कासवांची शिकार करतात व जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आंबट शौकिनांना पुरवतात. एकीकडे मानवाच्या अघोरी इच्छापूर्तीसाठी दररोज शेकडो कासवांचा बळी जातोय, काही कासव मानवाच्या गैरसमजांमुळे आजीवन कारावास भोगत आहेत. तर दुसरीकडे याच कासवांना गुप्त्धानाचे शोधक समजून 20 नखी, 21 नखी सांगून यांची अवैध तस्करी व व्यापार केला जातोय. परिणामतः अतिछळ करून त्यांचा बळी दिला जातोय. यातच भर ते काही लोकांना या प्राण्याला पाळण्याचा छंद जडला आहे. हजारो कासव त्यांच्या नैसर्गिक आवसातून पकडले जातात आणि अतिशय क्रूर पद्धतीने बंदिस्त करून विदेशात पोहचवले जातात. वन्यजीवांबद्दलच्या अनेक अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर पसरल्या आहेत. कासव हा देखील त्यातलाच एक वन्यजीव. जो रोज शेकडोंच्या संखेने या अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या मानवांकरवी बळी जातो. वनविभागाने स्व:ताची जबाबदारी जाणून अश्याप्रकारच्या घटनांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे.
कासव शिकार व तस्करीत भारतात बंगाल तर जगात चीन पुढे आहे. गुन्हे अन्वेषनात दुबळे असलेले आपल्या वनविभागाच्या उदासीन धोरणामुळे त्या तस्करांची जमानत होते व मग ते पुन्हा कधीही अवतरत नाहीत. एकंदरीतच विदेशी व्यक्तींनी भारतात कासवांची तस्करी केल्यास काहीही फरक पडत नाही, असे काहीसे चित्र तयार झाले आहे. बंगालमध्ये तर तथाकथित औषधी बनविण्यासाठी मृदु कवचाच्या कासवांना त्यांच्या पाठीचा किनारीचा नरम असलेला ज्याला इंग्रजीत क्यालीपी म्हणतो तो भाग कासव जिवंत असतांना कापण्यात येतो. त्यानंतर तो कापलेला भाग पाण्यात उकळतात व मग वाळवून त्याची भुकटी तयार करतात या भुकटीचे नियमित सेवन केल्यास म्हणे मनुष्य चिरतरुण राहतो. त्याची मर्दांनकी कायम राहते व वाढते इत्यादी. या सर्वाला काहीही वैज्ञानिक आधार नसतांना केवळ लोकांना फसवून पैसे कमावण्याच्या उद्देशाने या निष्पाप जीवांचा बळी घेतला जातो.
जगातील सर्वात जास्त कासवांच्या जाती आपल्या भारतात आहेत. पण यातील बहुतांश जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 च्या परिशिष्ट एकच्या भाग दोननुसार भारतातील प्रत्येक कासव अनुसूची एकमध्ये संरक्षित केला गेला आहे. या कायद्याचे उल्लंघन करून कासव पाळणे, शिकार करणे, तस्करी करणे किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास 3 ते 7 वर्षाचा कारावास आणि 25000 रुपये दंड अशी जबर शिक्षा आहे.